लाल मुंग्यांची चटणी कोरोना रोखण्याचे गुणकारी औषध?

Orissa High Court
  • हायकोर्ट म्हणते, आम्ही या विषयातील तज्ज्ञ नाही

कटक : लाल मुंग्या आणि हिरवी मिरची यांच्यापासून बनविलेली ‘काई चटणी’ हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे गुणकारी औषध असल्याने सध्याच्या कोरोना (Corona) महामारीच्या काळात या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी या चटणीची शिफारस करण्याचा आदेश सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी एक याचिका ओरिसा उच्च न्यायालयाने (Orissa High Court) फेटाळली. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरीस असलेले नयाधर पाधियाल यांनी ही याचिका केली. नयाधर हे बाथुडी या आदिवासी जमातीचे असून ही लाल मुंग्यांची चटणी आदिवासी समाजांमध्ये कित्येक पिढ्या प्रभावी औषध म्हणून वापरली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. या चटणीसाठी न्यायालयात याचिका करण्याची नयाधर यांची ही दुसरी वेळ होती.

आधी त्यांनी या चटणीसंबंधी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) या केंद्र सरकारच्या दोन अग्रगण्य संस्थांकडे विनंती अर्ज पाठविले होते. परंतु त्यांनी काहीच उत्तर न दिल्याने नयाधर यांनी पहिल्यांदा याचिका केली. गेल्या डिसेंबरमध्ये न्यायालयाने या दोन्ही संस्थांना नयाधर यांच्या विनंती अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश देऊन ती याचिका निकाली काढली होती. या दोन्ही संस्थांच्यावतीने केंद्रीय ‘आयुष’ मंत्रालयाने नयाधर यांना २१ जानेवारी रोजी उत्तर पाठविले. ‘सीएसआयआर’ने म्हटले होते की, आमच्याकडे कीटकांचे आहार किंवा औषध म्हणून सेवन करण्यासंबंधीच्या विषयाचे (Entomophagy) कोणीही तज्ज्ञ नसल्याने नयाधर यांच्या दाव्याची शहानिशा आम्ही करू शकत नाही. आयुर्वेद संशोधन परिषदेने म्हटले की, ‘ड्रग्ज अ‍ॅण्ड कॉस्मॅटिक्स अ‍ॅक्ट’च्या पहिल्या परिशिष्टात  आयुर्वेदावरील ज्या अभिजात ग्रंथांचा उल्लेख आहे त्यापैकी कोणत्याही ग्रंथात लाल मुंग्यांची चटणी औषध म्हणून वापरण्यासंबंधी कोणताही संदर्भ नाही.

त्यामुळे लाल मुंग्यांची चटणी किंवा काढा हा विषय आयुर्वेदीय औषध प्रणालीच्या कक्षेबाहेरचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर नयाधर यांनी दुसऱ्यांदा याचिका केली. ती मुख्य न्यायाधीश डॉ. एस. मुरलीधर व न्या. बी. पी. राऊतराय यांच्या खंडपीठापुढे आली तेव्हा नयाधर यांच्या वकिलांनी असे म्हणणे मांडले की, सरकारच्या या दोन्ही संस्थांकडे या विषयावर निर्णय घेण्याची क्षमता नाही तर त्यांनी हा विषय आणखी कोणाकडे तरी सोपवायला हवा होता. न्यायालयाने तसा आदेश द्यावा, अशी त्यांनी विनंती  केली.

ती अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, या दोन्ही संशोधन संस्थांनी कारणे निकाली दिली असली तरी नयाधर सांगतात त्या चटणीचा औषध म्हणून वापर करण्याचा पुरस्कार करणे शक्य नाही, असे त्यांनी कळविले आहे. त्या उपर  जाऊन त्यांचे म्हणणे योग्य की अयोग्य हे तपासणे हे न्यायालयाचे काम नाही; कारण आम्ही न्यायाधीश त्या विषयातील तज्ज्ञ नाही. शिवाय आदिवासी या मुंग्यांची ही चटणी किंवा काढा औषध म्हणून  वापरत असले तरी तसे ते त्यांच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे करीत आहेत. ते चूक आहे की बरोबर यावर भाष्य करण्याचे विशेष ज्ञानही न्यायालयाकडे नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button