राष्ट्रवादी मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत? भाजपचे खासदार, आमदार संपर्कात

Sharad Pawar

पुणे : २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेले अनेक नेते आता पक्षांतरण करण्याच्या किंवा घरवापसीच्या तयारीत आहेत. भाजपची सत्ता आली नसल्याने आता परत एकदा अनेक नेते त्यांच्या मूळ पक्षाशी जवळीक वाढवताना दिसून येत आहेत. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील आणि सातारचे शिवेंद्रराजे भोसले यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. भाजपकडून मात्र हे नेते भाजपमध्येच राहतील, असा दावा केला जात आहे. या नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत सतत होणाऱ्या भेटीगाठींमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात मोठा भूकंप करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

भाजपचे सांगलीचे खासदार संजयकाका पाटील जेवढे भाजपच्या कार्यक्रमांमध्ये, नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये दिसत नाहीत त्यापेक्षा जास्त ते राष्ट्रवादीच्या मंचावर दिसून येत आहेत. नुकतेच एका कार्यक्रमात संजयकाका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून दिसून आले होते. त्यामुळे संजय पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधे दाखल होणार अशी चर्चा सुरू असताना स्वतः संजयकाकांनी मात्र त्याबद्दल मौन बाळगलं. त्यांच्या या मौनाचे बरेच अर्थ काढले जात आहेत.

सांगलीशेजारच्या साताऱ्यामध्येही शिवेंद्रराजे भोसले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी भेटीगाठी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तर शिवेंद्रसिंहराजे अजित पवारांना भेटायला बारामतीला पोहचले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जेव्हा सातारा दौऱ्यावर असतात तेव्हा शिवेंद्रसिंहराजे त्यांच्या स्वागताला प्रत्येक वेळी हजर असतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदेंसोबत संघर्षाची भाषा करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंची भाषा अलीकडे मात्र मैत्रीपूर्ण झाल्याचं बघायला मिळत आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची सत्तेशिवाय राजकारण करायची सवय लपून राहिलेली नाही. विकासकामांसाठी आपण सत्ताधारी पक्षातील नेत्यांना भेटत असल्याचा दावा हे नेते करत असले तरी असाच दावा त्यांनी त्यांचा मूळ पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करतानाही केला होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे या नेत्यांच्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठी चर्चेचा विषय बनत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER