संशयाच्या फायद्याने निर्दोष सुटलेली व्यक्ती सरकारी नोकरीसाठी अपात्र

Supreme court - Maharastra Today
  • सुप्रीम कोर्ट म्हणते चारित्र्य संशयातीतच हवे

नवी दिल्ली : गंभीर किंवा गर्हणीय गुन्ह्याच्या (Serious and Heinous Crimes) खटल्यात न्यायालयाने संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडलेली व्यक्ती सरकारी नोकरीसाठी पात्र ठरू शकत नाही. सरकारी नोकरी करू इच्छिणाºया व्यक्तीचे चारित्र्य संशयातीतच असायला हवे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयान दिला आहे.

राजस्थान सरकारने तेथील उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केलेले अपील मंजूर करताना न्या. संजय कृष्ण कौल व न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. राजस्थान पोलीस दलाने पोलीस शिपाई या पदासाठी राबविलेल्या निवड प्रक्रियेत लव्ह कुश मीना नावाची व्यक्ती यशस्वी ठरली. तरी मीना यांना नियुक्ती देण्यात आली नाही. मीना यांच्यावर पूर्वी एक फौजदारी खटला चालला होता. त्यात ते निर्दोष सुटले होते. परंतु त्यांच्यावरील हा खटला गंभीर गुन्ह्यासाठी होता व त्यात मीना यांना संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले होते, असे कारण देऊन त्यांना नियुक्ती नाकारण्यात आली. याविरुद्ध मीना यांनी केलेली याचिका मंजूर करताना राजस्थान उच्च न्यायाल.

याने म्हटले होते की, मीना यांच्यावरील खटल्यात त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसल्याने ते नोकरीसाठी अपात्र ठरत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा ठरविताना पूर्वी अवतारसिंग प्रकरणात स्वत: दिलेल्या निकालाचा दाखला दिला. सरकारी नोकरीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित असेल किंवा त्याचा निकाल झालेला असेल अशी प्रकरणे कशी हाताळावीत, याचे निकष त्या निकालात ठरवून दिले गेले होते. त्यात असे स्पष्टपणे नमूद केले गेले होते की, उमेदवार फौजदारी खटल्यात निर्दोष ठरला असेल. पण हे निर्दोषित्व संशयाच्या फायद्याने दिले गेलेले असेल तर असा उमेदवारही नियुक्तीस अपात्र ठरतो.

या पोलीस भरतीच्या आधी राजस्थान सरकारने जे परिपत्रक काढले होते त्यात फौजदारी खटल्यात निर्दोष ठरलेले उमेदवारही निवडीसाठी पात्र मानले जातील, असे नमूद केले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या परित्रकाने फौजदारी खटल्यात निर्दोष ठरलेल्या सर्वांनाच दरवाजे खुले आहेत, असा अर्थ लावता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन जी कायद्याची चौकट ठरवून दिली आहे त्याच संदर्भात या परिपत्रकाकडे पाहावे लागेल.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button