‘खाकी सोडून खादीकडे आणि परत खाकीकडे’, सचिन वाझेंच्या जीवनातील रहस्यमय वळणे

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren case) संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या आजच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. ‘२००४ मध्ये मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं. तसंच काहीसं आता होत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत असून आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे’, असं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (WhatsApp status) ठेवून वाझे यांनी खळबळ उडवून दिली आहे. वाझे यांना पोलीस आयुक्तांनी हे स्टेट्स काढून टाकण्याच्या सूचना दिल्याची माहितीही पुढे आली आहे. मात्र, या निमित्ताने २००४च्या प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. नेमकं काय होतं हे प्रकरणं? त्यामुळे वाझे एव्हढे तणावात का आहेत? याबाबचा हा दृष्टीक्षेप.

२ डिसेंबर २००२ मध्ये घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू तर ३९ लोक जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. २७ वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने इंजीनियर होता. दुबईत कामाला होता. त्याच्यावर पोटाअंतर्गत कारवाई झाली होती. ६ जानेवारी २००३ मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. करण्यात आलं होतं. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेले जात असताना तो फरार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

कोर्टाने युनूस प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात युनूसचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. युनूसला तुरुंगात कपडे काढून पट्ट्यांनी मारहाण केल्याचं एका साक्षीदाराने कोर्टाला सांगितलं होतं. या प्रकरणी एकूण १४ पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले होते. मात्र, खटला केवळ चार पोलीस अधिकाऱ्यांवर चालवण्यात आला होता. त्यात वाझेसह तीन कॉन्स्टेबलचा समावेश होता. या प्रकरणात त्याचं २००४ मध्ये निलंबनही करण्यात आले होते. २००७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो नामंजूर करण्यात आला. दरम्यान, २०१८ नंतर या प्रकरणावर कोर्टात कोणतीही सुनावणी झाली नाही.

निलंबनानंतर तब्बल चार वर्षानंतर वाझे यांनी २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, शिवसेनेत ते फारसे सक्रिय दिसले नाही. केवळ राजकीय सुरक्षा कवच असावं म्हणून वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता, अशी चर्चा त्यावेळी होती. त्यानंतर १६ वर्षानंतर म्हणजे २०२० मध्ये त्यांचे पोलीस दलात पुनरागमन झालं होतं.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून वाझे यांचा पोलीस दलात दरारा होता. त्यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे. वाझे यांच्या नावावर ६० एन्काऊंटर आहेत. कुप्रसिद्ध गुंड मुन्ना नेपाळी यांचा एन्काऊंटरही वाझेंनीच केला होता. त्यानंतर ते अधिक प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

तब्बल २० वर्षानंतर पोलीस दलात आलेले वाझे लगेचच अ‍ॅक्शनमोडमध्ये आले होते. त्यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामींना अटक केली होती. त्यावेळी मला अटक करण्यासाठी एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकारी का पाठवला असा प्रश्न अर्णव यांनी केला होता.

वाझे हे केवळ एन्काउंटर स्पेशालिस्टच नाहीत तर ते टेक्नो सॅव्ही अधिकारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. ‘जिंकून हरलेली लढाई’, द स्कॉट, शीना बोरा: द मर्डर दँट शुक इंडिया आदी पुस्तकांचे ते लेखक आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER