
नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) येत्या १५ मार्चपासून प्रकरणांची सुनावणी न्यायदालनांत प्रत्यक्ष स्वरूपात घेणे मर्यादित प्रमाणावर सुरु करणार आहे. अशा प्रकारे कोरोना (Corona) महामारी सुरु झाल्यानंतर बंद केलेली प्रकरणांची प्रत्यक्ष सुनावणी सुमारे वर्षभरानंतर अंशत: पुन्हा सुरु होणार आहे.
न्यायालयाच्या प्रशासनाने यासाठी नवी ‘एसओपी’ प्रसिद्ध केली आहे. यानुसार मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी अंतिम/ नियमित सुनावणीची प्रकरणे न्यायदालनातील प्रत्यक्ष सुनावणीसाठी घेतली जातील. यासाठी ‘हायब्रिड’ म्हणजे प्रत्यक्ष वा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा दोन्ही पद्धती वापरल्या जातील. प्रकरण प्रत्यक्ष कोर्टात येऊन चालवायचे की, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने चालवायचे हे ठरविण्याचा पर्याय पक्षकारास असेल. एक पक्षकार प्रत्यक्ष हजर राहून व दुसरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने अशी संमिश्र पद्धतीनेही सुनावणी होऊ शकेल. कोणत्याच पक्षकाराने प्रत्यक्ष कोर्टात येण्याचा पर्याय निवडला नाही तर सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने घेतली जाईल. एखाद्या प्रकरणातील पक्षकारांची संख्या व न्यायालयातील जागेतील उपलब्धता यानुसार कोणती प्रकरणे अशा प्रकारे ‘हायब्रिड’ पद्धतीने सुनावणीस लावायची हे न्यायालय ठरवेल.
अशा प्रकारे ‘हायब्रिड’ सुनावणीसाठी न घेतल्या जाणाऱ्या व सोमवार आणि शुक्रवारी बोर्डावर घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकरणांची सुनावणी फक्त ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’नेच होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
– अजित गोगटे
ही बातमी पण वाचा : धक्कादायक: 85 जि.प. 116 पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व झाले रद्द
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला