नगर जिल्ह्यात दरोड्यांच्या आणि बुवाबाजीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ ; शिवसेना नेत्याचे पोलीस महानिरीक्षकांना पत्र

Neelam Gorhe

मुंबई : नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दरोड्यांचं प्रमाण वाढलं आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच नगर जिल्ह्यात बुवाबाजीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे.  त्यामुळे गोऱ्हे यांनी नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्रही लिहिले आहे.

निलम गोऱ्हे यांचे पत्र :

अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, महिला अत्याचाराच्या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोठेवाडी असो वा कोपर्डी येथील घटनांचा मागोवा घेतला तर अशा घटनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलीस प्रशासनास विशेष प्रयत्न करणे आवश्यक वाटत आहे. रविवारीच (२० डिसेंबर) पहाटे श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा गावात दरोडा पडल्याची घटना समोर आली. दरोडेखोरांनी विमल जाधव या ज्येष्ठ महिलेच्या घरातील ५० हजारांचा ऐवज चोरला. त्यांच्या कानातील दागिने खेचल्याने दोन्ही कानांच्या पाळ्या तुटल्या. यात जाधव आजी चांगल्याच जखमी झाल्या आहेत. घरात महादेव जाधव आणि विमल जाधव हे ज्येष्ठ दांपत्य होते. सुरुवातीला दरोडेखोरांनी घराची कडी वाजवली.

प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा उघडण्यासाठी धमकावले. शेवटी दरवाजा उघडला गेला. दरोडेखोरांनी आत येताच विमल जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावू लागले. विमल यांनी कानातील दागिने काढून देण्यास विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी दागिने पकडून जोरात हिसकावले. त्यामुळे जाधव यांच्या कानाच्या दोन्ही पाळ्या तुटल्या. दरोडेखोरांनी कानातील आणि गळ्यातील दागिनेही हिसकावून नेले असल्याचे समोर आले आहे, असेही नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. नीलम गोऱ्हे यांनी भोंदूबुवांवरही कारवाईची मागणी केली.

त्या म्हणाल्या, जमिनीतून सोने काढून देतो, भरपूर धनलाभ करून देण्याचे आमिष भक्तांना दाखवणार्‍या भोंदूबुवाला अखेर पोलिसांनी अटक केली. अशी अनेक प्रचलित नावे वापरून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. तसेच असे बुवा महिलांना लवकर जाळ्यात ओढत असतात. त्यातून महिलांवर अत्याचार झालेले प्रकार आपण यापूर्वीदेखील पाहिले आहेत.

असे असताना या बुवाने महिलांवरदेखील अत्याचार केले आहेत का? या संदर्भात पोलिसांनी महिलांना आवाहन करावं आणि या भोंदू व्यक्तीने जर कोणत्या महिलेवर अत्याचार केला असेल तर  पोलिसांशी  संपर्क करावा. पीडित महिलांची नावं गुप्त ठेवण्यात यावीत.

  • या दरोडेखोरांचा सतत वावर हा नाशिक, औरंगाबाद, नगर आणि बीड या जिल्ह्यांत  सुरू असतो. दरोड्यांच्या घटना भविष्यात घडू नये, दरोडेखोरांचा नायनाट करण्यासाठी नगर दरोडेखोरविरोधी  विशेष पोलीस पथकाची स्थापन करावी.
  • या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी पूर्वीच्या दरोड्यांच्या घटनांमध्ये आणि या घटनेत काय साम्य आहे याचा अभ्यास करावा. जेणेकरून दरोड्यांच्या कार्यपद्धतीवरून आरोपींना अटक करण्यास मदत होईल.
  • दरोडेखोरांकडून गावाशेजारील वस्त्यांना लक्ष्य केलं जात आहे. अशा वस्त्यांना गावाशी अथवा पोलीस स्थानकाशी जोडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.
  • समाजकंटक, दरोडेखोर यांना संरक्षण देणाऱ्या काही प्रवृत्ती या जिल्ह्यात आहेत. दरोडेखोरांच्या मुळाशी जाऊन अशा समाजकंटकांवरदेखील कारवाई होणे आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER