मिरवणुकीत झेंडा न दिल्याने छातीत चाकू खुपसला, हल्लेखाेराची कबुली

Murder for shivaji flag in aurangabad

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत श्रीकांत गोपीचंद शिंदे (२१) याची चाकूने भाेसकून निर्घृण हत्या करण्यात आली. श्रीकांत मोठ्या आकाराचा झेंडा घेऊन नाचत होता. आरोपी विजय ऊर्फ छोटू शिवाजी वैद्य (२६, रा. केंब्रिज चौक, चिकलठाणा) व राहुल सिद्धेश्वर भोसले यांनी त्याला झेंडा मागितला. परंतु, श्रीकांतने तो देण्यास नकार दिल्यामुळे राहुलने त्याच्यावर चाकूने वार केले, अशी कबुली अटकेतील अाराेपी विजयने दिली.

धार्मिक वृत्तीचा असलेला श्रीकांत संध्याकाळी मित्रांसोबत पुंडलिकनगरातील मिरवणुकीत सहभागी झाला होता. हनुमाननगर चौकात मिरवणूक पोहचली तेव्हा श्रीकांत हातात मोठा झेंडा फडकावत नाचत होता. त्याच्याजवळ सर्वांत मोठा झेंडा पाहून आरोपी विजय व राहुलने त्याला झेंडा मागितला. नाचण्याच्या नादात श्रीकांतने याकडे दुर्लक्ष केले. अारोपींनी दुसऱ्यांदा मागणी केल्यावर त्याने झेंडा देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने राहुलने चाकू काढून त्याच्यावर दोन वार केले. छातीत वार बसताच श्रीकांत रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार लक्षात येताच आरडाओरड सुरू झाली. ताेपर्यंत हल्लेखोर गर्दीतून पसार झाले होते. गारखेड्यातील हुसेन काॅलनीत राहणारा श्रीकांत बी.ए.चे शिक्षण घेत होता. घरात तो लहान होता. पूजापाठदेखील करत होता. त्यामुळे परिसरात त्याला सर्व जण ओळखत होते. त्याचे वडील वाळूज, तर मधला भाऊ पैठण एमआयडीसीतील फार्मा कंपनीत कामाला आहे. सर्वांत मोठा भाऊ पुण्याला सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे.

खंडणी मागणार्‍याला मद्यविक्रेत्याने दुकानातच डांबले !

विजयवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, करायचा भाईगिरी

विजयवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल अाहेत. ताे परिसरात भाईगिरी करायचा. राहुल त्याचा मित्र आहे. विजयवर सिडको व मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. भारतनगरात राहणाऱ्या भालचंद्र मुळे यांचा २६ जून २०१५ राेजी खून झाला हाेता. त्यात विजय आरोपी आहे. विशेष म्हणजे विजयसह नवनाथ शेळके व इतर दोघांवर १७ फेब्रुवारी रोेजी प्रशांत प्रकाश खजाणे या तरुणावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, पोलिसांनी त्याला अटक केली नाही. त्यामुळे विजय परिसरात फिरत होता. मिरवणुकीतदेखील सहभागी झाला. पुंडलिकनगर पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर कदाचित श्रीकांतचा नाहक बळी गेला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

दाेन पथके पुण्याला रवाना

श्रीकांतला जखमी अवस्थेत एमआयटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीतून पुंडलिकनगर पोलिसांनी विजयला चिकलठाणा परिसरातून अटक केली. तर राहुलच्या शोधासाठी दोन पथके पुण्याला रवाना झाली. त्याला लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलिसांनी सांगितले.