दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का : भाजपची मुसंडी

A joint panel of Prithviraj Chavan and BJP leader Atul Bhosale won in Karad

सातारा : कराड दक्षिणेत भाजपने डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्या नेतृत्वाखाली मोठी मुसंडी मारली असून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण गटाला सैदापूरसह कृष्णाकाठच्या गावांमध्ये धक्का बसला आहे. कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या  सहकारमंत्री बाळासाहेब पाटील गटाने वर्चस्व राखले आहे.

कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पाल, बनवडी, कोणेगाव, पार्ले, रिसवड, तांबवे, खोडशी यासारख्या मोठ्या गावात प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. तर कोपर्डे हवेली, सैदापूर, ओगलेवाडी या गावात चुरशीने निवडणूक झाली होती. पाल ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष देवराज पाटील गटाचे मागील दोन दशकांपासून वर्चस्व होते. या निवडणुकीतही त्यांनाच विजय निश्चित मानला जात असतानाच भाजपा पुरस्कृत पॅनेलने परिवर्तन घडवले आहे. देवराज पाटील गटाला ६ तर विरोधी गटाला ९ जागा मिळाल्या आहेत.

बनवडी येथे सलग ३० वर्ष सत्तेत असणाऱ्या शंकरराव खापे यांच्या गटाला जोरदार धक्का बसला आहे. खापे यांच्या जनसेवा पॅनेलला केवळ ३, तर विरोधी जनशक्ती पॅनेलला १० जागा मिळाल्या आहेत. सैदापूरमध्ये माजी उपसरपंच फत्तेसिंह जाधव गटाने ‘एकला चलो’चा नारा देत मोठा विजय मिळवला आहे. माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण समर्थक,भाजपा नेते डॉ. अतुल भोसले समर्थक तसेच माजी उपसभापती स्व.विठ्ठलराव जाधव गट एकत्रित आला होता. त्यानंतरही अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर समर्थक फत्तेसिंह जाधव यांनी बहुमत मिळवत माजी उपसरपंच सचिन पाटील, माजी उपसरपंच मोहनराव जाधव गटाला पराभवामुळे मोठा धक्का बसला आहे.

पार्ले येथेही सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक पॅनेलचा पराभव झाला आहे. पार्ले येथे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश नलवडे गटाला ६ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक पॅनेलला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. या गावात १० वर्षांनी सत्तांतर झाले आहे.तांबवे येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व अँड. उदयसिंह पाटील समर्थक, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील गटाने परिवर्तन घडवले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला असून या गटाला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर प्रदीप पाटील गटाला ८ जागा मिळाल्या आहेत.

कोणेगाव येथे परिवर्तन झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांना ३ जागावर विजय मिळाला आहे. या गावात स्व.विलासराव पाटील- उंडाळकर समर्थकांनी ६ जागांवर विजय मिळवत वर्चस्व निर्माण केले आहे. खोडशीमध्ये सह्याद्री कारखान्याचे संचालक पांडुरंग चव्हाण गटाने ८ जागांवर विजय मिळवत परिवर्तन घडवले आहे. विरोधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीत काँग्रेसने जोरदार टक्कर दिली आहे. हिंदुराव चव्हाण यांचे पुतणे काँग्रेसचे पदाधिकारी शैलेश चव्हाण यांच्या गटाने ७ जागांवर विजय मिळवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER