रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींच्या जामिनावर होणार एकत्रित सुनावणी

सुशांत सिंह मृत्यूनंतरची ‘एनसीबी’ची कारवाई

Reha Charobarty & Shovik charobarty

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूच्या अनुषंगाने कारवाई करून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) व तिचा भाऊ शोविक यांच्यासह सर्वच आरोपींच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयात येत्या मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी एकत्रित सुनावणी करणार आहे.

रिया व शोविकचे जामीन अर्ज न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणीस आले होते. रियाच्यावतीने अ‍ॅड. सतीश मानशिंदे यांनी थोडा युक्तिवादही केला. परंतु ‘एनसीबी’च्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी अशी विनंती केली की, या जामीन अर्जांवर २९ सप्टेंबर रोजी अब्देल परिहार, सॅम्युअल मिरांडाव, दीपेश सावंत या इतर आरोपींच्या अर्जांसोबतच सुनावणी घेण्यात यावी. न्यायालयाने ती मान्य केली व या प्रकरणात अनेक कायदेशीर मुद्दे उपस्थित झाले असून सिंग यांनी त्या सर्वांना उत्तर देण्याची तयारी करून यावे, असे सांगितले.

रिया व शोविकच्या जामीन अर्जांची प्रत ‘एनसीबी’ला अद्याप देण्यात आलेली नाही, असे सिंग यांचे म्हणणे होते. त्यावर अ‍ॅड. मानशिंदे म्हणाले की, दोन वेळा त्या प्रती देण्यात आल्या आहेत. तरीही आपण त्या आणखी एकदा देऊ.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने जो थोडा वेळ युक्तिवाद झाला त्यात रियाच्यावतीने अ‍ॅड. मानशिंदे यांनी असा मुद्दा मांडला की, मुळात ‘एनसीबी’ला या प्रकरणी तपास करण्याचा अधिकारच नाही. सुशांत सिंग मृत्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) वर्ग केला आहे. त्या तपासात अमलीपदार्थांशी संबंधित काही पैलू आढळल्यास त्याचा तपास ‘सीबीआय’ही करू शकते.

अवैध व्यापारासाठी नव्हे तर एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगत सेवनासाठी अमलीपदार्थ पुरविणाऱ्यांनाही अमलीपदार्थविरोधी कायद्याचे कलम २९ए लागू होते का, असा या प्रकरणांमधील कळीचा मुद्दा आहे.

विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडीची मुदत ६ आॅक्टोबरपर्यंत वाढविल्यानंतर रियाने उच्च न्यायालयात हा जामीन अर्ज केला आहे. सुशांत सिंह हा एकटाच अमलीपदार्थांचे सेवन करणारा होता व इतरांचा वापर तो आपले हे व्यसन भागविण्यासाठी करत असे, हे तपासातून समोर आल्याचे तिचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER