जे सरकार राजकीय विरोधकांवर सायबर हल्ले करू शकते, त्यांना चीनशी लढणे कठीण नाही – शिवसेना

CM Uddhav Thackeray

मुंबई : सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात सोशल मिडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांची (Mumbai Police) व महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. या प्रकाराची चौकशी सायबर क्राईमकडून करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी येथे केली. तसेच सोशल मिडियावर सुमारे ऐंशी हजार बनावट खाती उघडून महाराष्ट्राची बदनामी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेने (Shiv Sena) आजच्या सामनातील अग्रलेखात भाजपला लक्ष्य केले आहे. चे नुकतेच समोर आले आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारवर सायबर हल्ले करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् सोशल मीडियावर उघडण्यात आले. त्यातील बहुसंख्य अकाऊंटस् नेपाळ, टर्की, सिंगापूर, जपान, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, अमेरिकेतून चालविण्यात आली. जे सरकार देशांतर्गत राजकीय विरोधकांवर सायबर हल्ले करू शकते, त्यांना चीनशी लढणे कठीण नाही. अशी मिस्कील टीका शिवसेनेने आजच्या सामनातून भाजपवर (BJP) केली आहे.

जे सरकार देशांतर्गत राजकीय विरोधकांवर सायबर हल्ले करू शकते, त्यांना चीनशी लढणे कठीण नाही. 80 हजार फेक अकाऊंटस्च्या माध्यमातून लढलेल्या सायबर युद्धात शेवटी पराभवच पत्करावा लागला, पण लडाखच्या सीमेवर आणि कश्मीर खोऱ्यात आपल्याला जिंकावेच लागेल. चीनबरोबर युद्धास तयार असल्याची गर्जना हवाई दलप्रमुखांनी केलीच आहे. देश त्यांच्या सदैव पाठीशी आहे! राहुल गांधींनी पंधरा मिनिटांत चिन्यांना मागे हटवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्यांच्याकडे त्याबाबत कोणती योजना आहे? त्यावरही पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींशी (Rahul Gandhi) बोलायला हवे. शेवटी राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहेच! असा उपरोधिक सल्लाही शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना दिला आहे.

आजचा सामनातील अग्रलेख…

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘‘लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य बाहेर कधी काढणार? आमचे सरकार असते तर चिन्यांना पंधरा मिनिटांत उचलून बाहेर फेकले असते,’’ असा हल्ला राहुल गांधी यांनी केला व त्यावर अद्यापि भाजपकडून प्रत्युत्तर आलेले दिसत नाही. राहुल गांधी हे आधी हाथरसमध्ये गेले, नंतर पंजाबात व आता हरयाणात त्यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चाचे नेतृत्व केले. पोलिसांच्या विरोधाची पर्वा त्यांनी केली नाही. राहुल गांधी यांचे प्रतिमाभंजन करूनही हा गडी थांबायला तयार नाही, हे महत्त्वाचे. चीनप्रकरणी राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले व त्यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसूनही पंतप्रधान इतके थंड कसे? हा त्यांचा सवाल आहे. चिन्यांना पंधरा मिनिटांत बाहेर काढू, असे राहुल गांधींचे म्हणणे कुणाला ‘बकवास’ वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदींची अशा प्रकारची वक्तव्ये तपासून घ्यायला हवीत. पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीर खेचून आणण्याची भाषा कोणी केली होती, प्रत्येक कश्मिरी पंडिताची ‘घर वापसी’ करण्याचे वचन कोणी दिले होते व आता त्या वचनांची काय स्थिती आहे, ते स्पष्ट व्हायला हवे. चीनचा मुद्दा महत्त्वाचा आहे व सुशांत, कंगना वगैरे प्रकरणांचा जाळ कितीही पेटवला तरी हे राष्ट्रभक्तीचे विषय त्या धुरात हरवणार नाहीत. चिनी सेना लडाखच्या हद्दीत घुसून बराच काळ लोटला आहे. दोन देशांत चर्चेच्या सात फेऱ्या होऊन गेल्या, पण लाल चिनी काही मागे हटायला तयार नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर आपले हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी सांगितले आहे की, शेजारील राष्ट्रांकडून धोका वाढला आहे. आम्ही कोणत्याही आव्हानांसाठी सज्ज आहोत. स्पष्टच सांगायचे तर चीनबरोबर युद्ध करण्यासाठी सेना सज्ज आहे. हवाई दलप्रमुख असे सांगतात की, आपण दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढण्यास सक्षम आहोत. या दोन आघाडय़ा म्हणजे चीन आणि पाकिस्तान. चीन लडाखच्या हद्दीत बराच पुढे घुसून बसला आहे आणि पाकिस्तान कश्मीर खोऱ्यात रोज घुसखोरी करून आमच्या जवानांचे रक्त सांडत आहे. हवाई दलप्रमुख दोन्ही आघाड्यांवर लढण्याची भाषा करीत असतानाच तिकडे दक्षिण कश्मीरमधील पंपोर येथे पाकड्या अतिरेक्यांनी सी.आर.पी.एफ. जवानांच्या बटालियनवर हल्ला केला. त्यात दोन जवान शहीद झाले व बरेच जण जखमी झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांत असे हल्ले वाढले आहेत. चीनची आघाडी सांभाळत असताना पाकिस्तानची आघाडी ढिली पडली आहे. सर्जिकल स्ट्राइक वगैरे करून निवडणुका जिंकता आल्या, पण पाकिस्तानचे संपूर्ण कंबरडे मोडता आलेले नाही, हे सत्य जितक्या लवकर स्वीकारले जाईल तितके देशाच्या सुरक्षेसाठी ते बरे राहील. गेल्या वर्षभरात कश्मीर खोऱ्यात किती जवानांचे बळी गेले, याबाबत खरा आकडा समोर आला पाहिजे. महाराष्ट्रातच आठवड्यातून एक-दोन जवानांचे तिरंग्यात लपेटलेले देह येत आहेत. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. 370 कलम हटविले त्याचे कौतुक सगळ्यांनीच केले. कश्मीरचा संपूर्ण राज्याचा दर्जा काढून तो केंद्रशासित प्रदेश केला. लेह, लडाख हा स्वायत्त प्रदेश केला. त्या लडाखमध्येच आता चिनी सैन्याने बसकण मारली आहे. त्यामुळे दोन आघाड्यांवर आपल्याला लढावे लागेल. पाकिस्तानला उठसूट धमक्या देणारे आपण चीनच्या बाबतीत मात्र त्याचे साधे नाव घ्यायला का तयार नाही? पाकिस्तानला धडा शिकवू तसा धडा चीनला का शिकवला जात नाही? आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका, हिंदुस्थानला कमी लेखू नका, हिंदुस्थानचे सैन्य सक्षम आहे, हे आता नेहमीचेच संवाद आहेत. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास तयार असल्याचे बोलावेच लागते, पण चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून विसावले, ही परिस्थिती नेमकी कोणती? हिंदुस्थान आणि चीनमधील तणावाचा फायदा कमजोर पडलेले पाकिस्तानही घेताना दिसत आहे. कश्मीर खोऱ्यातील हल्ले तेच दर्शवीत आहेत. प्रत्यक्ष ताबा रेषेवर आज एक प्रकारचा सन्नाटा पसरला आहे. हिंदुस्थान-चीनचे सैन्य अगदी समोरासमोर उभे ठाकले आहे. तणाव आणि संघर्ष अशा शिगेला पोहोचला आहे की, फक्त एक ठिणगी पडण्याचा अवकाश, भडका उडालाच म्हणून समजा. गलवान खोऱ्यातला तणाव चिंताजनक आहे व थोडी गडबड झाली तरी मग एकदुसऱ्यांना आवरणे कठीण जाईल.

गलवानच्या चिनी घुसखोरीनंतर दोन देशांत चर्चेच्या सात फेऱ्या झाल्या व चीनसोबतच्या सीमावादावर चर्चेने तोडगा निघू शकतो असा हवाई दलप्रमुख भरवसा देत आहेत. मग चिन्यांनी गलवान खोऱ्यात आमचे 20 जवानांचे बळी का घेतले? आमचे जवान सर्व प्रकारच्या आव्हानांशी सामना करण्यास समर्थ आहेतच, ते देशांच्या सीमा रक्षणासाठी सदैव सज्ज आहेत. जवानांचे शौर्य आणि त्यागच देशाला सदैव सुरक्षित ठेवत आहे, पण म्हणून त्यांना नाहक बळी जाऊ द्यायचे काय? हा प्रश्न आहेच. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी ‘अटल टनेल’चे उद्घाटन केले. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी या बोगद्याचे महत्त्व मोठे आहे. हा बोगदाच उडवून देऊ, अशी धमकी चिनी सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने दिली आहे. म्हणजे चर्चेच्या सात फेऱ्या झाल्या तरी चिनी माकडांची खुमखुमी कायम आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर आधी चिनी सैन्य घुसले. त्यामुळे आधी त्यांनी माघार घ्यावी, हे हिंदुस्थानचे म्हणणे आहे. चिनी सैन्याला लडाखच्या हद्दीतून मागे फिरावे लागेल, नाहीतर चर्चेला अर्थ नाही, पण चीनचा इतिहास एक इंचही मागे हटण्याचा नाही. त्यामुळे आपण पुढे काय करणार? हाच सवाल आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासीयांना मोठय़ा अपेक्षा आहेत. पाकव्याप्त कश्मीरवरच तिरंगा फडकवण्याचे भाष्य त्यांनी अनेकदा केले आहे. त्यामुळे लडाखमध्ये घुसखोर चिनी सैन्यालाही ते मागे ढकलतील, याबाबत देशवासीयांच्या मनात कोणतीच शंका नाही. पुन्हा कोणत्याही प्रकारचे युद्ध खेळण्याची मानसिकता सरकारमध्ये आहे, हे अनेक प्रकरणी सिद्ध झाली आहे. असे म्हणत शिवसेनेने भाजपला डिवचले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER