चांगली मैत्री असलेल्या मित्रांनीच केला मित्राचा खून

शेळ्या वळवून आणण्यास सांगण्यावरून झाला होता वाद

Murder

औरंगाबाद :- तिघेही चांगले मित्र. गुरुवारी तिघेही चिंचखेडा खुर्द शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. ते मोबाईलवर लुडो गेम खेळत होते. दरम्यान झालेल्या वादातून पंधरा वर्षीय मुलाचा त्याच्या मित्रांनीच खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील (जि. औरंगाबाद) चिंचखेडा शिवारातील गायरान तळ्याजवळ गुरुवारी (दि.७) ला घडली. कौतीक राठोड असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ पाच तासातच पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, राहुल सुबाराम जाधव (२५) व त्याचा लहान भाऊ ( विधि संघर्ष बालक) व कौतीक राठोड ( १५) हे तिघेही गुदमातांडा येथील रहिवासी असून त्यांच्यात चांगली मैत्री आहे.

ही बातमी पण वाचा : अपघातातील दुसऱ्या विद्यार्थ्याचा ही मृत्यू

गुरुवारी तिघेही चिंचखेडा खुर्द शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दरम्यान ते मोबाईलवर लुडो गेम खेळत होते. सायंकाळी ६ वाजेदरम्यान कौतीकने राहुलच्या लहान भावास त्याच्या शेळ्या वळवून आणण्यास सांगीतले. मात्र राहुलच्या भावाने त्यास नकार दिल्याने कौतिकने त्याला चापट मारली. भावाला मारल्याचे पाहून राग अनावर झालेल्या राहुलने कौतीकला मारहाण सुरु केली.

यात कौतिक बेशुद्ध पडला, मात्र यावर न थांबता दोन्ही भावांनी मिळून दोरीने कौत्तिकचा गळा आवळत खून केला. यानंतर दोघे भाऊ दुचाकीवरून तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी जगदीश सातव, पोनि. सुनिल नेवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, पोलिसांनी आरोपींना धुळे येथून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोनि. सुनिल नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. कुठूंबरे करत आहेत.