एका लग्नाची वेगळी गोष्ट

मुलीचं लग्नं का जुळत नाहीय ओ… अहो का म्हणजे काय, मुलगी जरा वर्णानं सावळी आहे ना… तुमच्या मुलीचं जमलं का ओ कुठे… अहो नाही ना, खूपच स्थूल आहे ना ती त्यामुळेच जरा नकार येताहेत. आणि तुमच्या मुलाचे लाडू मिळणार का यंदा… कसले लाडू ओ, असं पहिल्यांदाच बघून, भेटून लग्नं करायचं का असं म्हणून टाळतोय तो. तुमच्या मुलाचं यंदा वाजणार ना ओ… काय माहित बुवा, त्याला करिअर करणारी मुलगी नकोय म्हणे. आजकाल हे संवाद अशा घरांमध्ये नेहमीचे झाले आहेत जिथे जाड, काळीसावळी मुलगी किंवा ठरवून केलेल्या लग्नाविषयी साशंक असलेली, करिअरिस्टीक की हाऊसवाइफ अशा कन्फ्युजनमध्ये अडकलेली मुलं आहेत. हाच ताजा विषय सध्याच्या मालिकांची वन लाइन स्टोरी बनला असून एका लग्नाच्या या वेगळ्या गोष्टी प्रत्यक्षातही घडत आहेत.

वजनदार प्रेमाची दिलदार गोष्ट अशी कॅचलाइन घेऊन आलेल्या लतिकाच्या लग्नाची गोष्ट मालिकेतून मांडली जात आहे. लतिकाला ३४ नकार आलेत आणि त्याचे कारण आहे ते तिचे वजन. वास्तवातही यंदा कर्तव्य आहे या पंक्तीत असलेल्या जाड मुलींना नकार देण्याचे कारण मुलगी स्थूल आहे असेच असते. मुलींपेक्षा जाड मुलांकडूनच अनेकदा ही नकारघंटा वाजते. मालिकेतील लतिकाच्या माध्यमातून जाड मुलींच्या जाडेपणापेक्षा त्यांचा स्वभाव, गुण ओळखावे असा संदेश दिला आहे. कथेच्या गरजेमुळे येणाऱ्या संवादातून जाड मुलीचे लग्न ठरत नसल्याने तिच्या मनावर होणारा परिणाम, तिच्या आईवडिलांची काळजी, तिच्यासाठी पसंतीचा निरोप आला तर काहीही करून तिच्या डोक्यावर अक्षता पडण्यासाठी होणारी धांदल हे सगळं या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. समाजात अशा मुली खरोखरच आहेत की फक्त त्या जाड आहेत म्हणून लग्नासाठी हव्या असलेल्या मुलीच्या अपेक्षेत त्या बसत नाहीत. अक्षया नाईक या वजनदार अभिनेत्रीने जाडजूड लतिकाची भूमिका साकारली आहे.

जशी जाड मुलींना लग्न ठरत नाही म्हणून वजनावरून हिणवले जाते तसेच चित्र आहे वर्णाने काळ्या, सावळ्या असलेल्या मुलींच्या बाबतीत. मुलगी गोरीच हवी असा उल्लेख आजही अनेक मुलांच्या बायोडेटात अपेक्षा या शब्दापुढे असतो. मुलगा गोरा असेल आणि त्याने सावळी मुलगी निवडली तर त्यांच्या लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडींच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव असतात. अनेकांच्या खऱ्या आयुष्यात हे अनुभव आलेले आहेत. मुलीचं वर्णाने सावळेपण किंवा काळेपण तिच्या गुणांना बाजूला सारून सौंदर्याच्या कथित व्याख्येत अडथळा बनते. याच संकल्पनेवर सध्या सुरू असलेली मालिका म्हणजे रंग माझा वेगळा. मुलाने पसंत केलेली काळ्या वर्णाची मुलगी सून म्हणून पसंत नाही म्हणून तिला घराबाहेर काढण्याचे प्रयत्न करणारी सासू आणि मग साहजिकच मुलीच्या काळ्या वर्णापेक्षा तिचं मन, विचार बघा हा मालिकेतून दिला जात असलेला संदेश यांची छान सांगड या मालिकेत घातली आहे. खऱ्या आयुष्यात गोरी गोरी पान असलेली रेश्मा शिंदे या मालिकेत काळ्या वर्णाची दीपा साकारत आहे. तर तिच्या त्वचेच्या रंगापेक्षा मनाच्या रंगावर भाळलेल्या नायकाच्या भूमिकेत आशुतोष गोखले आहे.

हे झालं शरीरमान, वर्ण या चौकटीतलं. पण सध्या मालिकांमधील लग्नाच्या वेगळ्या गोष्टीत ऑनलाइन लग्नाचीही चर्चा आहे. मला नाही करायचंय लग्न बिग्न असं म्हणणाऱ्या सुयश टिळक अर्थात ऑनस्क्रिन शंतनु सध्याच्या तरूणाईचीच भाषा बोलतोय. मॅट्रीमोनी साइटवर फोटो बघायचा, व्हाटसअॅप, इन्स्टा, मेसेंजरवर चॅटिंग आणि त्यानंतर कॉफीशॉपमध्ये भेट. त्यात जमलं, वाटलं तर पुढे घरी सांगायचं नाही तर गुडबाय असं ठरवणाऱ्या जनरेशनच्या लग्नाची गोष्ट ऑनलाइन शुभमंगल यामालिकेने आणली आहे. सुयश टिळक आणि सायली संजीव यांची फ्रेश जोडी शुभमंगल ऑनलाइन मालिकेची वेगळी कथा फुलवत आहे. इकडे शुभमंगल ऑनलाइन सुरू असताना फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत आठवी शिकलेला मुलगा आणि स्पर्धा परीक्षा देत आयपीएस होण्याची स्वप्न पाहणारी मुलगी यांच्या लग्नाची कथा आहे. कधी कधी माणसाच्या आयुष्यात अशी वेळ येते की लग्नासाठी खूप मोठी तडजोड करावी लागते. त्या परिस्थितीत तो निर्णय महत्त्वाचा असला तरी असा प्रसंग वास्तवातही अनेक मुलींच्या वाट्याला येतो. किर्ती आणि शुभम यांची ही कथा फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून उलगडत आहे. तडजोड म्हणून उच्चशिक्षित असूनही आठवी पास मुलासोबत लग्नाला तयार झालेल्या मुलीची भूमिका समृद्धी केळकर साकारत आहे.

लग्नाचा थाट आणि मालिका हे समीकरण आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये होतं. पण सध्या लग्नाच्या वेगळ्या गोष्टींसोबत भेटणाऱ्या या मालिकांनी आणि कलाकारांच्या अभिनयाने समाजातील एकेक महत्त्वाच्या विषयालाच हात घातला आहे. घराघरांमध्ये अशा लतिका, अभिमन्यू, दीपा, कार्तिक, कीर्ती, शुभम, शंतनु, शर्वरी आहेत की त्यांचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मालिकांच्या निमित्ताने का असेना पण लग्नाच्या अपेक्षाचे रूप यामुळे नक्की बदलेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER