अमेरिकेसाठी आनंदाचा दिवस; राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मास्क काढला

Joe Biden

वॉशिंग्टन : अमेरिकेसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे. कारण अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मास्क (Mask) काढला. ज्यांनी लस (Vaccination) घेतली आहे असे लोक आता गर्दी नसलेल्या ठिकाणी विनामास्क वावरू शकतात, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांनी मास्क काढण्यास हरकत नाही, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर जो बायडन यांनी अमेरिकेसाठी हा सर्वांत मोठा दिवस असल्याचं म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या नियमावलीनंतर, जो बायडन यांनी आपल्या कार्यालयातील खासदारांसह मास्क काढला.

अमेरिकेतील नव्या नियमांनुसार, नागरिक आता खुल्या किंवा बंद ठिकाणी, जिथे गर्दी नाही तिथे विनामास्क फिरू शकतात. मात्र गर्दीची ठिकाणं असलेल्या बंद जागा जसे की बस, विमान प्रवास, रुग्णालये, प्रार्थनास्थळे अशा ठिकाणी मास्क लावण्याची सूचना केली गेली आहे. ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांनी बायडन प्रशासनावर कोरोना नियम कमी करण्यासाठी दबाव आणला होता. लसीकरणामुळे अमेरिकत कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. त्याशिवाय अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्स लेबर युनियननेही येत्या काळात शाळा सुरू करण्याची शिफारस केली आहे. १२ ते १५ वर्षांच्या मुलांना फायजर लस देण्यास मंजुरी मिळाल्याने, ही शिफारस करण्यात आली आहे.

अमेरिकेत कोरोनाबाबत (Corona) नवी नियमावली आल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात मास्क काढला. या कार्यक्रमात जो बायडन यांनी अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लस घेण्याचं आवाहन केलं. याबाबत जो बायडन यांनी ट्विटही केलं आहे. ते म्हणतात, नियम आता एकदम सरळ आहेत. लस घ्या किंवा मग जोपर्यंत लस घेत नाही तोपर्यंत मास्क घाला. याची निवड तुम्हाला करायची आहे, ही तुमची मर्जी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button