न्यायालयाच्या आदेशाने वॅक्सिनचा प्रकल्प पुण्यात आणला; अजितदादांनी भाजपला सुनावले

Ajit Pawar

मुंबई :- पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे आदेश खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी पार पाडली. भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे ‘भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopade) यांचा आरोप खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औटघटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

देशावरील कोरोना (Corona) संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट) कंपनीची जागा मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली व दाद मागितली. उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश दिले. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याची जबाबदारी पार पाडली, असे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक असून, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा, विभागाचा औद्योगिक, आर्थिक, पायाभूत विकासासाठी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Govt.) बांधील आहे. विरोधकांनी खोटे, तथ्यहीन आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता थांबवावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

ही बातमी पण वाचा : अजितदादांनी नागपुरातील कोव्हॅक्सीनचा प्रकल्प पुण्याला पळवला, मंत्री मात्र गप्प

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button