यंदाच्या युएस ओपनमध्ये दिसतेय परस्परविरोधी चित्र

Pablo Carreno - Alexander Zverev

यंदाच्या युएस ओपनमध्ये (US Open Tennis) अखेरच्या टप्प्यात पुरुष व महिला एकेरीत अगदी परस्परविरोधी चित्र दिसत आहे. पुरुषांमध्ये अगदी नवे खेळाडू, ज्यांनी आतापर्यंत एकही ग्रँड स्लॅम (Grand Slam) स्पर्धा जिंकलेली नाही ते उपांत्य फेरीत (Semi Finals) पोहोचले आहेत तर महिलांमध्ये उपांत्य फेरीत पोहोचलेल्या चार पैकी तीन खेळाडू अशा आहेत की ज्या नुसत्या ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्याच (Former winners) नाहीत तर त्यांनी एकापेक्षा अधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

पुरुषांचे उपांत्य सामने पाब्लो कॅरेनो बस्टा विरुध्द अलेक्सान्देर झ्वेरेव आणि दानिल मेद्वेदेव विरुध्द डॉमिनीक थिएम असे होणार आहेत.

महिला एकेरीच्या उपांत्य लढती जेन ब्रॉडी विरुध्द नाओमी ओसाका आणि सेरेना विल्यम्स विरुध्द व्हिक्टोरिया अझारेंका अशा होणार आहेत.

पुरुषांच्या उपांत्य लढतीतील सर्व खेळाडू तिशीच्या आतील आहेत तर महिलांतील सेरेना ही 38 वर्षांची व अझारेंका 31 वर्षांची आहे. एवढंच नाही तर सेरेनाने 23 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत तर ओसाका व अझारेंका यांच्या नावावर ग्रँड स्लॅम स्पर्धांची प्रत्येकी दोन विजेतेपदं आहेत. याउलट पुरुषांतील चौघांपैकी एकानेही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही.

स्वतः आई असलेली सेरेना विल्यम्स लागोपाठ दुसऱ्या सामन्यात ‘आई’ खेळाडूशी खेळणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यात तिने ज्या स्वेताना पिरोन्कोव्हाला मात दिली तीसुध्दा आईची होती तर अझारेंकासुध्दा लिओ नावाच्या साडेतीन वर्षाच्या मुलाची आई आहे. सेरेनाची मुलगी अलेक्सिस ओलीम्पिया ही आता तीन वर्षांची आहे.

सेरेनाला लागोपाठ तीन सामन्यात विजयासाठी पूर्ण तीन सेट झुंजावे लागले आहे तर अझारेंकाने अवघ्या तासाभरात एलीस मर्टेन्सचा 6-1, 6-0 असा फडशा पाडला.

अझारेंका व सेरेना या चांगल्या मैत्रिणी असून त्यांची स्पर्धा बऱ्याच सामन्यांची आहे. 2012 व 2013 च्या युएस ओपन अंतिम सामन्यांमध्ये सेरेनाने अझारेंकाला पराभूत केले होते. 2012 च्या सामन्यात तर अझारेंका तिसऱ्या सेटमध्ये 5-3 अशा स्थितीत विजयासाठी सर्विस करत असताना 5-7 अशी पराभूत झाली होती.

या दोघीतील लढतींपैकी 18 सामने सेरेनाने तर चार सामने अझारेंकाने जिंकले आहेत. मात्र शेवटच्या सात लढती पूर्ण तीन सेट रंगलेल्या आहेत. 2019 च्या इंडीयन वेल्स स्पर्धेत या दोघींचा शेवटचा सामना झाला होता तो सेरेनाने जिंकला होता.

2018 च्या विजेत्या ओसाकाचा सामना पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचलेल्या जेनिफर ब्रॅडीशी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER