बदलौकिक असलेले… की कात टाकणारे शहर

Covid Jumbo Center

Shailendra Paranjapeकरोना (Corona) संसर्गाबद्दल तसंच नव्याने करोना संसर्ग झालेल्या व्यक्तीला नेमके कोणत्या रुग्णालयात जागा उपलब्ध आहे, याची माहिती मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे पहाटे अडीच ते साडेपाच अशी तीन तास रुग्णवाहिकेतून ससेहोलपट होण्याची वेळ एका रुग्णावर आली. पुण्यातून दारोदार फिरल्यावर वाघोलीला जाण्याचा सल्ला मिळाला आणि तेथून पुढे पिंपरीला गेलात तर कदाचित जागा मिळेल, असं सांगण्यात आलं. अखेर पिंपरीतल्या रुग्णालयात या रुग्णाला जागा मिळाली पण तोवर रुग्ण आणि त्याचे नातेवाइक अक्षरशः जीव मुठीत धरून हे तीन तास अनुभवत होते.

करोना रुग्णांना इतका त्रास का देतात हो, असा प्रश्न पत्रकाराला विचारून रुग्णाच्या नातेवाइकानं आपली अगतिकता, असहाय्यता व्यक्त केलीय, ती काळजाला घरं पाडणारीच आहे. जम्बो कोविड सेंटरमधे पत्रकाराचा प्राण गेला. केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याच्या सरकारचे सर्वेसर्वा असलेले नेते बैठका घेताहेत पण आजही हातातल्या मोबाइलवरून संपूर्ण पुण्यात कोणत्या रुग्णालयात जागा आहे, हे का समजू नये…

एकीकडे आपला देश अंतराळ संशोधनात जगातल्या मोजक्या देशांपैकी एक, असं स्थान मिळवतोय. दुसरीकडे चांद्रमोहिमेची तयारी आपण करतो पण माझ्याच शहरात आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या रुग्णाला तीन तीन साडेतीन तास रुग्णवाहिकेतून फिरवावे लागते, हे कशाचे लक्षण आहे. संपूर्ण आरोग्य व्यवस्था मोडकळीस आल्याचेच तर हे लक्षण नाही ना…

त्यामुळे करोनावर तर आजघडीला उपचार किंवा लस उपलब्ध नाहीच पण किमान आरोग्य व्यवस्थेतल्या मुर्दाडपणावर काही ना काही जालीम उपायांची गरज नक्कीच आहे. करोना रुग्णांसाठी विविध रुग्णालयात कार्यरत असलेल्या अहोरात्र काम करणाऱ्या करोना योद्ध्यांच्या बद्दल पूर्ण आदर ठेवूनही कुठे तरी काही तरी चुकतेय, हे मांडावेच लागतेय. कारण एखाद्या रुग्णाला तीन चार तास रुग्णवाहिकेतून अर्ध्या रात्रीत पुणे दर्शन घडवले जाण्याची ही पहिली वेळ नाहीये. त्यामुळे करोना योद्धे करताहेत ते काम मोलाचे आहेच पण प्रशासकीय पातळीवर किमान पुण्यातल्या सर्व रुग्णालयांची कोविड सेंटर्सची माहिती ऑनलाइन का उपलब्ध होऊ नये.

अनेकदा बातम्यांमधून नेतेमंडळींनी अधिकाऱ्यांना डँशबोर्ड बनवा आणि रुग्णालयातील स्थितीची अद्ययावत माहिती त्यावर द्या, असे सांगितल्याचे वेळोवेळी बातम्यांमधून प्रसारित झालेय. पण असे डँशबोर्ड एखाद्या रुग्णालयात असून उपयोग नाही तर शहरातल्या आणि अगदी जिल्ह्यातल्याही उपचार केंद्रांची स्थितीदर्शक माहिती ताजी माहिती सहजी मोबाइलवरून उपलब्ध व्हायल् हवी. तसं झालं तरच रुग्णांची ससेहोलपट थांबू शकेल.

केंद्र सराकरनं पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ३५ जिल्ह्यांमधे संवेदनशील परिस्थिती असल्याचे नमूद केलेय. त्यामधे महाराष्ट्रातले १७ जिल्हे समाविष्ट आहेत. ही नक्कीच भूषणावह बाब नाही. त्यामुळे युद्धपातळीवर कामाला सुरूवात करून महाराष्ट्राचा हा बदलौकिक थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारनं कंबर कसायला हवी आणि राजकीय हेवेदावे बाजूला छेवून एकदिलानं महाराष्ट्राचं नाव किमान बदलौकिक असलेल्या राज्यांच्या यादीतून बाहेर पडेल, यासाठी काम करायला हवं. पुण्याचा लौकिक तर करोनादृष्ट्या सर्वात आघाडीवरचं शहर असा झालेला आहे. पुण्याच्या गणेशोत्सवानं संयमाची पराकाष्टा करत राज्यासमोर आदर्श घालून दिलाय. तसाच तो करोनाबद्दल स्थिती नियंत्रणात आणणारं शहर असा कमीत कमी काळात पुनस्थापित केला तरच पुण्याला गेलेली प्रतिष्ठा मिळू शकेल, नाही तर मग करोनोत्तर जगात एक बदलैकिक असलेले शहर, हीच पुण्याची नवी ओळख ठरेल.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER