प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्याच्या विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

Pratap Sarnaik & Mumbai Police

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्याविरुद्ध ‘टॉप्स सिक्युरिटी’ प्रकरणातील गैरव्यवहारांची तक्रार करणारे रमेश अय्यर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अय्यर यांनी केलेल्या तक्रारीवरूनच प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग यांच्याविरुद्ध ईडीने (ED) चौकशी सुरू केली आहे.

टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांनी रमेश अय्यर यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. रमेश अय्यर यांनी आर्थिक घोटाळा केला, ज्यामुळे टॉप्स कंपनीला मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित चांदोळेला अटकही झाली आहे. ईडीकडून या प्रकरणात तपास चालू असतानाच तक्रारदारावरच मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने ईडी विरुद्ध मुंबई पोलीस असा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीकडून सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांची देखील चौकशी करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि कंपनीत मोठ्या पदावर असलेले अमित चंडोळे यांना ईडीने दोन दिवसांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे.

अमित चंडोळे हे आमदार प्रताप सरनाईक यांचे बालपणीचे मित्र आहेत. प्रताप सरनाईक यांच्यासोबत ते डोंबिवलीहून ठाण्यात व्यवसायासाठी आले. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. ‘विहंग ग्रूप ऑफ कंपनी’ला मोठा फायदा होत गेला. अमित चंडोळे सध्या या कंपनीचे डायरेक्टर आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये देखील त्यांची भागीदारी आहे. अमित चंडोळे टॉप सिक्युरीटी आणि विहंग ग्रुप ॲाफ कंपनी यांच्यातील मुख्य दुवा आहे अशी माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER