फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल

Devendra Fadnavis - Maharastra Today

नाशिक : नाशिक शहरात सध्या कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याने सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. यावेळी फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, शिवराळ भाषेचा वापर असलेला व्हिडीओ तयार करून फेसबुक सारख्या समाजमाध्यमावर पोस्ट केल्याप्रकरणी पाच संशयितांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात नाशिकरोड भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड (Hemant Gaikwad) यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. देवेंद्र फडणवीस, नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan), आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ भारती पवार, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले,महापौर सतीश कुलकर्णी आदी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता पालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी अज्ञात इसमांनी फडणवीस यांना उद्देशून आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला आणि हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करून राजकीय तेढ निर्माण करण्यासह फडणवीस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहंकडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे या पाच जणांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून हा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. आता या पाच जणांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मी शहरात राहिलो असतो तर तुम्हाला बघून घेतले असते.’ अशा शब्दांत संकेत भोसले याने गिरीश महाजन यांना उद्देशून स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून हा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केला. त्यात फडणवीस यांनाही मारण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या अदखलपात्र गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास शेळके करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button