वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Waris Pathan

मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

वारिस पठाण यांनी एका जाहीर सभेत बोलताना ‘आम्ही १५ कोटी १०० कोटींना भारी आहोत’ असे विधान केले होते. १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका सभेत पठाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

यापूर्वी याच वक्तव्यासाठी पठाण यांच्या वक्तव्याविरोधात पुण्यामध्येही तक्रार दाखल झाली आहे. आता कलबुर्गी पोलिसांनीही भारतीय दंड विधानाच्या कलम ११७, १५३ (दंगा भडकावण्याचा प्रयत्न) आणि कलम १५३ ए (दोन समूहांत घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न) नुसार पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या अगोदर एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. तर, दुसरीकडे औरंगाबादचे खासदार व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील वारीस पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचे सांगितलेले आहे.