सामूहिक हिंसाचाराबाबत पंतप्रधानांना खुले पत्र लिहिणाऱ्यांविरुद्ध खटला दाखल

मुजफ्फरपूर : सामूहिक हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना काळजी व्यक्त करणारे खुले पत्र लिहिणाऱ्या ५० पेक्षा जास्त लोकांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. येथील वकील सुधीरकुमार ओझा यांनी या प्रकरणी २ महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती. त्या संदर्भात न्यायाधीश सूर्यकांत तिवारी यांनी खटला दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

वकील ओझा यांनी याचिकेत आरोप केला होता की संबंधित व्यक्तींनी देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या कामाचे मूल्य कमी करण्यासाठी हे खुले पत्र लिहिले होते. पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्यात चित्रपट निर्देशक मणिरत्नम, अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, अभिनेता सौमित्र चटर्जी, अभिनेत्री अपर्णा सेन आणि गायिका शुभा मुद्गल यांचा समावेश आहे.