ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी एक लाखाची लाच स्विकारली

बांधकाम उपअभियंता लाचेच्या सापळ्यात

Bribe Case

हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्या बांधकामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडे एक लाख २५ हजारांच्या लाचेची मागणी करुन एक लाख रुपये स्विकारलेल्या बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याला मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा व सत्र न्यायालयामागील मनिषा कॉलनीत रंगेहाथ पकडले. श्रीराम बाबुराव बिरारे (५१, रा. मनिषा कॉलनी) असे लाच स्विकारलेल्या उपअभियंत्याचे नाव आहे.

एका शासकीय ठेकेदाराने काही वर्षांपुर्वी हर्सूल कारागृहातील बांधकामाचा ठेका घेतला होता. या बांधकामाचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिल्लक होते. या बिलाची रक्कम देण्यासाठी उपअभियंता बिरारे याने ३० मार्च रोजी ठेकेदाराकडे एक लाख २५ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले. पण ठेकेदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या अनुषंगाने पंचांसमक्ष तपासणी केली.

त्यानंतर मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ठेकेदाराकडून घरातच एक लाखांची लाच स्विकारताना बिरारेला रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची झाडाझडती सुरू होती. ही कारवाई अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे, पोलिस नाईक संतोष जोशी, विजय बाम्हंदे, सुनील पाटील, महिला पोलिस नाईक दराडे, शिपाई व्ही. टी. चव्हाण, आणि सी. एन. बागुल यांनी केली.