दारुबंदीची ऐसीतैसी : चंद्रपुरात लग्नपत्रिकेसोबत दारुची बाटली आणि चकणा

चंद्रपुरात लग्नपत्रिकेसोबत दारुची बाटली आणि चकणा

चंद्रपूर : संपूर्ण दारूबंदी असलेल्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एका लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेतच दारूची बाटली, काजू, किसमीस आणि चकणा भेट देण्यात आला. या निमंत्रण पत्रिकेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दारूबंदी असली तरी चंद्रपुरात दारू सर्रास मिळते अशा बातम्या येत असतात. आता तर लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसोबतही दारू पाठविली जाते! बल्लारपूर येथील किराणा व्यवसायिक पूनमचंद मंघानी यांच्या मुलाचा विवाह चंद्रपुरातील ए. डी. हॉटेल येथे १६ डिसेंबर रोजी थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते निमंत्रण पत्रिका. ही खास निमंत्रण पत्रिका नागपुरातील एका आर्टिस्टकडून बनविण्यात आली होती. पत्रिकेच्या पेटीत सर्वात वर लग्न समारंभाचे निमंत्रण होते. पत्रिकेच्या खाली गोवा येथून मागविण्यात आलेली खास महाग दारू, काजू, किसमीस, भुजीया शेव असा चकणा होता.

संपूर्ण दारूबंदी असलेल्या या जिल्ह्यात ही निमंत्रण पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. चंद्रपूर व बल्लारपूर शहरात किमान १५ ते २० कुटुंबांना ही खास निमंत्रण पत्रिका मिळाली आहे. या निमंत्रण पत्रिकेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या लग्न पत्रिकेने दारूबंदीची लक्तरं वेशीवर टांगली आहेत.

याबाबत स्वतः पूनमचंद यांनी सांगितले, हा विवाह सोहळा गोवा येथे आयोजित होता. करोनामुळे चंद्रपुरातील एन. डी. हॉटेल मध्ये विवाह सोहळा करावा लागला. या निमंत्रण पत्रिका नागपुरातील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून तयार करून घेतली आहे. अशा केवळ ४० ते ४५ पत्रिका छापल्या. त्या नागपूर, कल्याण व उल्हासनगर येथे वितरीत केल्या. चंद्रपूर किंवा बल्लारपुरात एकही निमंत्रण पत्रिका वितरीत केली नाही. पत्रिकेचा व्हिडीओ देखील ईव्हेंट कंपनीनेच व्हायरल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER