
मुंबई :- पहाटे पडत असलेल्या दाट धुक्यांमुळं (Fog) मुंबईसह राज्यात थंडीचं आगमन झाल्याचं चित्र आहे. या थंडीची आतुरतेनं वाट पाहात असलेले लोक यामुळे सुखावले आहेत. मुंबईमध्ये गेले दोन दिवस पावसाने (Rain) हजेरी लावल्यानंतर आज पहाटेपासून मुंबईवर दाट धुक्याची चादर दिसून येत आहे. पारादेखील खाली आला असून मुंबईकर गुलाबी थंडीचा आनंद घेत असल्याचं सर्वत्र चित्र आहे.
मुंबईतील हवेत गारवा चांगलाच वाढल्यानं पहाटे व्यायाम करण्यास तसेच निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. इतके दिवस कोरोनामुळे (Corona) घरात असलेले मुंबईकर आता पहाटे मात्र या धुक्यात आणि गुलाबी थंडीत बाहेर पडून त्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
राज्यातील काही भागात गेल्या चार दिवसांत तुरळक पाऊस पडला होता. आता राज्यातील बहुतांश भागात थंडीनं जोर धरला आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात झपाट्यानं घट झाली आहे. पुढील काही दिवस हे थंडीचं चित्र कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला