
चंदीगड : माणूस वयाने वृद्ध झाला म्हणून त्याच्यातील मूळची गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढणार नाही याची खात्री देता येत नाही, असे म्हणत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने प्यारासिंग या ९५ वर्षांच्या (95 years old) वृद्ध आरोपीस अटकपूर्व जामीन नाकारला.
अमेरिकेत अवैध मार्गाने स्थलांतराची व्यवस्था करण्याचे आमिष दाखवून एका इसमाला ६.५ लाख रुपयांना फसविण्याचा प्यारासिंग याच्यावर आरोप आहे. आपल्याला या प्रकरणात निष्कारण गोवले गेले आहे. आता या वयात दैनंदिन जीवन सुरळीतपणे जगणे मुश्कील असताना असा गुन्हा कोणी करू शकेल, हेच मुळात अविश्वसनीय आहे, असे म्हणत त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
मात्र प्यारासिंगची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जामीन नाकारताना न्या. एच. एस. मदान यांनी म्हटले की, वयोवृद्धांची प्रकरणे न्यायालयाने सहानुभूतीने हाताळावी, अशी अपेक्षा असली तरी माणसाची हाव वय, लिंग किंवा जातीचे कोणतेही बंधन पाळत नाही, हेही तितकेच खरे.
ज्याच्या फसवणुकीच्या तक्रारीवरून प्यारासिंग व इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे त्यालाच प्यारासिंगने प्रत्येकी २.५ लाखांचे दोन चेक दिले होते व ते दोन्ही चेक न वटता परत आले होते. याची दखल घेत न्यायालयाने म्हटले की, माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही, असे प्यारासिंग म्हणतो तर मग त्याने फिर्यादीला हे दोन चेक कशासाठी दिले होते? फिर्यादीकडून घेतलेली सर्व रक्कम एकट्या प्यारासिंगने ठेवून घेतली की इतर आरोपींनाही वाटून दिली? गुन्ह्यात या तिघांसह आणखी कोणी सामील होते का, याचा उलगडा होण्यासाठी प्यारासिंगला कोठडीत घेऊन तपास करणे गरजेचे आहे. याआधीही प्यारासिंगने दोन गुन्हे केले होते, याचीही न्यायालयाने नोंद घेतली.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला