90 च्या दशकातील रुपेरी पडद्यावरील सुपरहिट जोडी शाहरुख-काजोल

Kajol - Shahrukh Khan

बॉलिवुडमध्ये (Bollywood) प्रेक्षक नायक-नायिकांची जोडी पाहाण्यासाठी जात असतात. एखादी जोडी त्यांना आवडली की त्यांचे चित्रपट पाहायला प्रेक्षक प्रचंड गर्दी करतात. निर्मात्यांना जेव्हा एखाद्या जोडीबाबत प्रेक्षकांचे हे प्रेम लक्षात आले की, त्या जोडीला घेऊन चित्रपट बनवण्याची लाटच येते. मात्र प्रत्येक वेळी ती जोडी यशस्वी होतेच असे नाही. अगदी राज कपूर नर्गिसपासून, (Raj kapoor-Nargis) धर्मेंद्र-हेमा, (Dharmendra-Hema malini) अमिताभ-रेखा (Amitabh-Rekha) ते गोविंदा-करिश्मा (Govinda-Karisma) आणि आताच्या अक्षयकुमार कॅटरीनापर्यंत (Akshaykumar-Katrina Kaif) अनेक जोड्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसल्या. राज कपूर नर्गिस यांनी तर आठ वर्षात 16 चित्रपट एकत्र केले होते. राज कपूर नर्गिसनंतर शाहरुख (Shahrukh Khan) आणि काजोलची (Kajol) जोडी प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतली होती. 90 च्या दशकातील ही सुपरहिट जोडी मानली जाते. या जोडीने सात चित्रपट नायक-नायिका म्हणून एकत्र केले तर शाहरुखच्या पाच चित्रपटात काजोलने पाहुणी कलाकार म्हणून काम केले. कारण शाहरुख आणि आदित्य चोप्रा (Aaditya Chopra) काजोलला लकी मानत असत. सर्व चित्रपट प्रेक्षकांना आवडले. या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री खूपच चांगली दिसून येते.

शाहरुख आणि काजोलची जोडी सर्वप्रथम जमली ती बाजीगर (Baazigar) चित्रपटात. तीसुद्धा योगायोगाने. काजोलने बेखुदी (Bekhudi) चित्रपटातून बॉलिवुडमध्ये प्रवेश केला होता. हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला होता. त्यामुळे ती तशी नाराज होती. अब्बास मस्तान (Abbas-mustaan) यांनी काजोलला या चित्रपटाबाबत विचारले, दोन नायिकांचा चित्रपट असतानाही काजोलने काहीच नसण्यापेक्षा काहीतरी हातात असलेले बरे असा विचार करून हा चित्रपट स्वीकारला. मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी अब्बास मस्तान यांनी अनेकांना विचारले होते परंतु नकारात्मक भूमिका असल्याने कोणीही तयार झाले नव्हते. शाहरुखला चित्रपट ऑफर झाला त्याने लगेचच स्वीकारला आणि चित्रपटाने इतिहास घडवलाच बॉलिवुडला शाहरुख काजोलची जोडीही दिली. खरे तर प्रेमी जोड्याच्या रुपात आलेले नायक-नायिका चालतात परंतु येथे तर खलनायक झालेला नायक आणि नायिकेची जोडी होती पण ती प्रेक्षकांना भावली.

या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री निर्माता दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांना जाणवली आणि त्यांनी आपल्या करण अर्जुनसाठी (Karan Arjun) शाहरुख काजोलची जोडी बनवली. चित्रपट सुपरहिट झाला आणि शाहरुख-काजोलची जोडी प्रेक्षकांना आणखी आवडू लागली.

1995 मध्ये आदित्य चोप्राने (Aaditya Chopra) शाहरुख आणि काजोलला घेऊन रोमांटिक चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (Dilwale Dulhniya Le jayenge) बनवला. या चित्रपटाबाबत त्याने कोणाला कसलीही माहिती दिली नव्हती. गपचुप चित्रपट तयार केला होता. चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने यशाची नवी शिखरे गाठली. 25 वर्ष एकाच चित्रपटगृहात टिकून राहाण्याचा विक्रमही याच चित्रपटाच्या नावावर आहे.दिलवाले दुल्हनियां ले जायेंगेमधील राज-सिमरनच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते.

आदित्य चोप्राच्या पावलावर पाऊल टाकत करण जोहरनेही (Karan Johar) आपल्या पहिल्याच ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch hota hai) चित्रपटात शाहरुख आणि काजोलची जोडी घेतली, हा चित्रपटही हिट झाल्याने ही जोडी रुपेरी पडद्यावरील हमखास यश मिळवून देणारी जोडी असे म्हटले जाऊ लागले.

यानंतर 1999 मध्ये काजोलने अजय देवगन (Ajay Devgan) बरोबर लग्न केले आणि ती संसारात मग्न झाली. 2003 मध्ये ती आई झाली. त्यामुळे अनेक वर्ष ती चित्रपटसृष्टीपासून दूरच होती. शाहरुख-काजोल जोडी पुन्हा दिसण्याची शक्यता कमी झाली होती. परंतु पुन्हा एकदा करण जोहरने या जोडीला एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आणि ‘माय नेम इज़ खान’ चित्रपटात काम करण्यासाठी काजोलला तयार केले. केवळ करणने सांगितले म्हणून काजोल या चित्रपटात काम करण्यास तयार झाली होती. नऊ वर्षानंतर ही जोडी एकत्र येणार म्हणून त्यांचे प्रशंसकही आनंदी झाले होते. परंतु चित्रपटात दम नसल्याने प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. त्यानंतर पुन्हा पाच वर्षानंतर शाहरुख काजोलची जोडी दिलवाले चित्रपटातून एकत्र आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यश मिळवणारा ठरला.

याशिवाय काजोलने शाहरुख अभिनीत डुप्लिकेट (1998), कल हो ना हो (2003), कभी अलविदा ना कहना (2006), ओम शांति ओम (2007) आणि रब ने बना दी जोड़ी (2008) या चित्रपटांमध्ये पाहुणी कलाकार म्हणून काम केलेले आहे. आता मात्र ही जोडी पुन्हा पडद्यावर येण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER