87 टक्के कसोटी सामन्यात बदलला गेलाय संघ, विंडीजचा मात्र 11 सामन्यांत होता सारखाच संघ

west Indies

भारत आणि आॕस्ट्रेलियादरम्यानच्या चौथ्या कसोटीत ब्रिस्बेनला जो भारतीय संघ खेळला ते 11 खेळाडू पुन्हा एकत्र संघ म्हणून क्वचितच खेळतील अशी चर्चा आहे. आॕस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जो संघ जाहीर झाला आहे त्यावरुन हे दिसूनही आले आहे.

ब्रिस्बेन कसोटीत रोहित शर्मा, शुभमन गील, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयंक अगरवाल, रिषभ पंत, वाॕशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि टी. नटराजन असा 11 खेळाडूंचा संघ खेळला. यापैकी नवदीप सैनी व टी. नटराजन यांना इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेले नाही. याप्रकारे पुढेसुध्दा ब्रिस्बेन कसोटीत खेळलेले 11 खेळाडू एकाच संघात एकत्र खेळताना दिसतील का याबद्दल शंकाच आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्याला संघात एक दोन बदल होणे स्वाभाविक आहे. तसे होतच असते. म्हणून कसोटी सामन्यांचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत ज्या 4035 वेगवेगळ्या प्लेईंग इलेव्हन (Playing XI) होत्या त्यापैकी 3494 संघ म्हणजे तब्बल 86.6 टक्के संघ एकदासुध्दा रिपीट झाले नाहीत.म्हणजे त्या प्लेंइंग इलेव्हन फक्त एकच सामने खेळल्या.407 प्लेइंग इलेव्हन फक्त दोन सामने खेळल्या तर तीन सामन्यात एकच संघ कायम राहिला असे 15 पेक्षाही कमी संघ आहेत.

यासंदर्भात वेस्ट इंडीजच्या नावावर अद्भुत विक्रम आहे. त्यांच्या डेस्मंड हेन्स, गार्डन ग्रिनीज, विव्ह रिचर्डस, रिची रिचर्डसन, कार्ल हुपर, गस लोगी, जेफ दुजाँ, पॕट्रीक पॕटरसन, माल्कम मार्शल, कर्टली अॕम्ब्रोज व कोर्टनी वाॕल्श हा 11 खेळाडूंचा संघ तब्बल 11 कसोटी सामन्यांसाठी कायम होता. त्यांनी एकही बदल केला नव्हता.

यानंतर 2000 च्या आसपासचा आॕस्ट्रेलियन संघ तब्बल 9 कसोटी सामने कायम होता.

भारतातर्फे दोन प्लेइंग इलेव्हन अशा आहेत ज्या प्रत्येकी चार कसोटी सामने खेळल्या. पहिला संघ सुनील गावसकर, करसन घावरी , कपिल देव, सैयद किरमाणी, दिलीप वेंगसरकर, गुंडाप्पा विश्वनाथ, शिवलाल यादव, राॕजर बिन्नी, चेतन चौहान, दिलीप दोशी व यशपाल शर्मा यांचा आहे तर दुसरा भारतीय संघ जो चार सामन्यांसाठी कायम होता त्यात सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी, कपिल देव, प्रविण आमरे, मोहम्मद अझहरुद्दीन,राजेश चौहान, अनिल कुंबळे, किरण मोरे, मनोज प्रभाकर, वेंकटपथी राजू, नवज्योतसिंग सिध्दू यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER