ग्राहकांना फसविणाऱ्या रेशन दुकानदारांविरुद्ध ७९ खटले दाखल

वैध मापन शास्त्र यंत्रणेची राज्यभर तपासणी मोहीम

Ration

मुंबई : कोरोना (कोवीड-19) च्या काळात ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वैध मापन शास्त्र विभागाने राज्यातील सर्व रेशन/ स्वस्त धान्य दुकानांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत एकूण 886 स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये ग्राहकांना वस्तू वजनात कमी दिल्यासंबंधीचे 2 खटले व इतर नियमांचे उल्लंघनाबाबत 77 असे मिळून एकूण 79 खटले नोंदविण्यात आले आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचे वितरण राज्य शासनाकडून राज्यातील रेशन दुकान व स्वस्त धान्य दुकानामार्फत करण्यात येते. कोरोना (कोवीड-19) प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अशा दुकानदारांकडून फसविले जाऊ नये, यासाठी राज्यातील सर्व रेशन दुकाने व स्वस्त धान्य दुकाने यांची तपासणी करण्याबाबतचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी दिले होते. त्यानंतर वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक तथा गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) श्री. अमिताभ गुप्ता यांनी त्यांचे मार्गदर्शनाखाली तपासणी मोहिम सुरू केली. या मोहिमेत आतापर्यंत विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रेशन दुकानदारांविरुद्ध 79 खटले दाखल करण्यात आले असल्याची माहिती श्री. गुप्ता यांनी दिली.

वैध मापन शास्त्र यंत्रणा ही ग्राहकांच्या हिताच्या रक्षणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांना सजग राहण्याचे निर्देश श्री. गुप्ता यांनी दिले आहेत.

ग्राहकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, रेशन दुकान व स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून वजनात अथवा मापात वस्तू कमी मिळत असतील, तसेच आवेष्टीत वस्तू छापील किंमतीपेक्षा जादा दराने दिल्या जात असतील, तर ग्राहकांनी क्षेत्रीय वैध मापन शास्त्र कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा  [email protected] या ई-मेलवर तक्रार नोंदवावी.


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER