मोदी-शहा यांच्या विरोधातील ७६० कोटींची याचिका रद्द; अमेरिकेच्या न्यायालयाचा निर्णय

PM Modi & Amit Saha

दिल्ली : अमेरिकेतील एका न्यायालयाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah) यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली १० कोटी डॉलरची  (७३६ कोटी ४७ लाख रुपये)  याचिका फेटाळली आहे. फुटीरतावादी काश्मीर-खलिस्तानी गट आणि दोन व्यक्तींनी ही याचिका दाखल केली होती. एका वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार याचिकाकर्ते या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयाने दिलेल्या तारखांना हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका रद्द केली.

टेक्सासमधील ह्युस्टन येथे १९ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती. भारताने जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्यासंदर्भात संसदेमध्ये घेतलेल्या निर्णयाविरोधात ही याचिका होती. याचिकाकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा  आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल कंवलजीत सिंह ढिल्लाँ यांच्याकडून नुकसानभरपाई म्हणून १० कोटी डॉलर्सची मागणी केली होती. ढिल्लाँ हे सध्याचे डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे महानिर्देशक आणि संरक्षण प्रमुखांसाठी (चीफ ऑफ डिफेन्स) ‘इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ’चे उप-प्रमुख आहेत. अमेरिकेतील टेक्सासमधील दक्षिण टेक्सास जिल्हा न्यायालयामधील न्यायाधीश फ्रान्सेस एच. स्टेसी यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशात ‘काश्मीर खलिस्तान रेफरण्डम फ्रंट’ला या याचिकेची सुनावणी पुढे केली जावी यासंदर्भात काहीच केलेले नाही.

सुनावणीसाठी देण्यात आलेल्या दोन तारखांनाही याचिकाकर्ते उपस्थित राहिले नाहीत, असे सांगत याचिका रद्द केली. ‘काश्मीर खलिस्तान रेफरण्डम फ्रंट’सोबत इतर दोन याचिकाकर्ते कोण आहेत हे कळू शकले नाही. त्या दोन्ही याचिकाकर्त्यांची नावं टीएफके आणि एसएमएस अशी देण्यात आली होती. अर्ज करणाऱ्यांची बाजू मांडण्याची जबाबदारी फुटीरतावादी वकील गुरुपतवंत सिंग पानून यांनी स्वीकारली होती.

मागील वर्षी भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. या कलमामुळे जम्मू-काश्मीरचा आर्थिक विकास खुंटला आहे म्हणून आम्ही हे कलम रद्द करत आहोत, असे सरकारने सांगितले होते. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन वेगळ्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER