राज्यातील आश्रमशाळांत मागील 15 वर्षांत सर्पदंशाने 700 विद्यार्थ्यांचा मृत्यू

नांदेड : राज्यातील आश्रमशाळांना आता सापांचा विळखा बसत असून गेल्या 15 वर्षांत जवळपास 700 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याला आश्रम शाळांची दुरवस्था कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील कुपटीच्या सरकारी आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन मुलींना 15 दिवसापूर्वी विषारी साप चावला. विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याने शिक्षक धावले, पण कुपटी मुख्य रस्त्यापासून 25 किलोमीटर दूर आहे. दुर्गम भाग असल्याने वाहनांची सोय नाही. कोसळत्या पावसात शिक्षकांनी दोन्ही मुलींना मुख्य रस्त्यापर्यंत नेलं आणि 7 तासानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. 11 दिवसांनी एका मुलीचं निधन झालं तर सुदैवानं दुसरीचे प्राण वाचले.

या शाळेभोवती जंगल आहे. पण सरकारी आश्रमशाळांची अवस्था फारच वाईट आहे. सव्वादोनशे मुलांच्या रहिवासाची इमारत. जेवणाच्या हॉलमध्ये मुलींनी राहायचे. जेवण उरकले की तिथल्याच फरशीवर झोपायचं. हॉलमध्ये मुलींना शौचालयाची सोय नाही. त्यामुळे अपरात्री जीव मुठीत घेऊन बाहेर जावे लागते.

आश्रमशाळेतील मृत्यूनंतर एका वृत्त वाहिनीने राज्यभरातल्या आश्रमशाळांमध्ये किती मृत्यू झालेत याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सरकारने आजवर जाहीर न केलेला अहवाल हाती आला.

साप चावून, मलेरियाचे डास चावून, पाण्यात बुडून, गंभीर आजारानं 2001 पासून मार्च 2017 पर्यंत 1 हजार 595 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर फक्त सर्पदंशानं 700 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे.