अंगुरीबाग येथून ७० किलो प्लास्टिक जप्त

दुकानदाराला ठोठावला २५ हजारांचा दंड

70 kg plastic seized from Anguribagh

औरंगाबाद : राज्य शासनाने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातल्यानंतरही शहरात अशा प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. महापालिकेच्या नागरिक मित्रपथकाने अंगुरीबाग भागातील दुकानांची तपासणी केली असता या ठिकाणी ७० किलो प्लास्टिक आढळून आले. दुकानदाराकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करून प्लास्टिक जप्त करण्यात आले.

पर्यावरणाला हानिकारक असलेल्या सिंगल युज प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्यासाठी एक मे ही डेडलाइन देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे कारवाई सुरू असली तरी अनेक व्यापारी सिंगल युज प्लास्टिकची विक्री करत आहेत. त्यामुळे महापालिकेने अशा व्यापाऱ्यांच्या विरोधात आत्तापर्यंत अनेक वेळा कारवाई केली. मात्र प्लास्टिकची विक्री थांबलेली नाही. प्लास्टिक चोरीच्या मार्गाने उपलब्ध होत असल्याने वापरही वाढला आहे. महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाने शुक्रवारी सायंकाळी अंगुरीबाग भागात संजय प्लास्टिक या दुकानाची तपासणी केली असता या ठिकाणी ७० किलो सिंगल युज प्लास्टिक आढळून आले. हे प्लास्टिक जप्त करत संबंधित व्यापाऱ्याकडून तब्बल २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.