मनसे शाखेसाठी ६५ वर्षीय आजीचे उपोषण; राज ठाकरेंनी घेतली दखल

65-year-old grandmother hunger strike for Raj Thackeray notice

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे (MNS) सत्तेच्या मुख्य प्रवाहात नसली आणि अख्ख्या राज्यात एकमेव आमदार असला तरी खेडोपाडी, शहरांत, गावांतील लोकांच्या मनामनांत मनसे बसलेली आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राज ठाकरेंचं वलय राज्यात आहेच हे सांगायला नको; कारण ते अनेक प्रकरणांतून लख्ख निदर्शनास येतेच. सत्ता असो वा नसो राज ठाकरेंभोवती कार्यकर्त्यांचं  जाळं नेहमी कायम असतं. मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभेत १३ आमदार निवडून गेले.

यातील अनेक आमदारांनी मनसेची साथ सोडत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. मागील दोन  विधानसभा निवडणुकीतही मनसेला हवं तसं यश आलं नाही; पण कार्यकर्त्यांची जिद्द आणि उत्साह असाच कायम असल्याचं शहापूर येथील एका घटनेवरून पाहायला मिळालं आहे. शहापूरच्या खर्डी येथे मनसेची शाखा ग्रामपंचायतीने तोडली; मात्र ही शाखा तोडली म्हणून मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांनाही लाजवेल असा उत्साह असलेली ६५ वर्षीय आजी चक्क उपोषणाला बसली.  गेल्या तीन  दिवसांपासून खर्डी येथे त्यांचे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाची दखल खुद्द राज ठाकरेंनी घेतली आणि चक्र वेगाने फिरले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज त्या आजींची भेट घेतली. या भेटीनंतर अविनाश जाधव आणि ग्रामपंचायतीच्या प्रशासनाशी बोलणी झाली.  यात संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी मनसेची शाखा पुन्हा स्वखर्चाने बांधून देण्याचे कबूल केले.

तसेच येत्या काही दिवसांतच मनसेची शाखा त्याच भागात ग्रामपंचायतीच्या खर्चातून उभी राहील, असंही सांगण्यात आलं आहे. मनसेची ही शाखा वाचवणाऱ्या या आजीचं पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी फोन करून कौतुक केलं.


साभार लोकमत.