हिंसाचारप्रकरण : ६३० जण ताब्यात, दिल्ली पूर्वपदावर

630 people arrested for Delhi violence

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हिंसाचाराने गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांचा जीव घेतला. दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १२३ गुन्हे नोंद केले आहेत. तर ६३० जणांना ताब्यात आणि काहींना अटक केली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी एम. एस. रांधवा यांनी दिली आहे.

आता राजधानी दिल्लीतील जीवन हळूहळू आणि स्थिरतेने पुढे जात आहे. दुकाने उघडत आहेत, वाहने बाहेर येत आहेत. बाजारात हालचाली पाहायला मिळत आहेत. तर झालेल्या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा ४१ वर गेला आहे. हिंसाचाराचे प्रकार थांबवण्यासाठी दिल्ली पोलीस आणि पॅरा मिलिटरी फोर्सच्या सैनिकांनी रात्रीच्या वेळी हिंसाग्रस्त भागात गस्त घातली. मौजपूर, करावलनगर, भजनपुरा, सीलमपूर आणि झफरबाद अशा भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

खबरदारी म्हणून अफवा टाळण्यासाठी पोलीस लोकांशी चर्चाही करत आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली पोलीस हिंसाचारग्रस्त भागात अमन समितीची बैठक घेत आहेत. सोशल मीडियावर पाठवण्यात येणाऱ्या मेसेजवर पोलिसांचे लक्ष आहे. खोटे आणि अफवा पसरवणारे मेसेज पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. कोणी खोटे मेसेज पाठवलेच तर त्यांच्यावर सायबर सेलचा दणका बसणार आहे.

शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत ९ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश