काबूलमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू

Kabul Bomb Blast

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील एका लग्नसमारंभात झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ६३ जणांचा मृत्यू झाला. तर १८२ जण जखमी झाले आहेत. याबाबत अफगाणिस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या तरी या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही संघटनेने घेतली नाही.

त्यामुळे हा स्फोट कुणी घडवला आणि यामागे काय उद्देश होता, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. या लग्नसमारंभात हजारहून अधिक लोक सहभागी झाले असताना हा स्फोट झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तालिबान आणि इस्लामिक स्टेट काबूलवर नेहमीच हल्ले करत असतात. मात्र हा काबूलमधील आजवरच्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक असू शकतो.