ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी; शेतकऱ्यांची ६० हजार पत्रे राज्यपालांकडे सुपूर्द

Bhagat Singh Koshiyari - Devendra Fadnavis- Sudhir Mungantiwar

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे सरकारने शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. मात्र, या कर्जमाफीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला असून याबाबत त्यांनी थेट राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लिहिलेली ६० हजार पत्रे राज्यपालांकडे सुपूर्द केली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ठाकरे सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले आहेत. मात्र, कालच्या यादीत केवळ २०८ शेतकऱ्यांचाच समावेश करण्यात आला आहे. फसव्या कर्जमाफीसंदर्भात एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ६० हजारांवर शेतकऱ्यांनी दिलेली पत्रे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्वाधीन केली. यातील काही पत्रे ही शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेली आहेत. यातूनच शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष दिसून येतो.

‘ह्या सरकारला आम्ही ओढलेल्या रेषेपेक्षा मोठी रेष ओढता येत नाही’ – देवेंद्र फडणवीस

सरकारने जी कर्जमाफी केली आहे त्याचा त्यांना कुठलाही फायदा मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, अधिवेशनाला अजून महिना बाकी असताना दुसऱ्याच दिवशी घाईगडबडीत सुधारित सरपंच निवड विधेयक नियमबाह्य पद्धतीने सभागृहात मंजूर करून घेण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच अशा प्रकारे नियमाच्या बाहेर काम होत असेल तर राज्यपालांनी यात लक्ष घालून याला परवानगी देऊ नये, अशी विनंती केली असल्याचे सांगितले.