अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकारी तिजोरीतून ६ कोटींची खैरात !

Maharashtra Today

मुंबई :- कोरोना (Corona) साथीच्या काळात उत्पन्नाचे स्रोत आटल्यामुळे राज्य सरकारला आर्थिक अडचणीत आहे. तिजोरी रिकामी असल्यामुळे गेल्यावर्षीपासून राज्य सरकारने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. त्याच वेळी राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सोशल मीडियावर (Social Media) सुमारे ६ कोटी रुपयांचा दौलतजादा करण्याचा घाट घातला आहे.

सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केले. अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघेल. याशिवाय, व्हॉट्सअॅप बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही या कंपनीवर असेल. अजित पवार यांचे सचिव आणि सामान्य माहिती व जनसंपर्क विभागाशी बोलणी झाल्यानंतर या नव्या कंपनीकडे सर्व कारभार सोपवला जाईल.

आदेश

सामान्य प्रशासन विभागाच्या या आदेशात म्हटले आहे की, माहिती व जनसंपर्क महासंचलनालयात (DGIPR) सोशल मीडिया हाताळण्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक आणि तांत्रिक गोष्टींची माहिती असणाऱ्या लोकांची कमतरता आहे. त्यामुळे हे काम बाहेरच्या यंत्रणेकडे देणे योग्य ठरेल. अजित पवार यांनी घेतलेले निर्णय आणि महत्त्वाच्या घोषणांबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे ही या यंत्रणेची जबाबदारी असेल.

लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचू शकतील, याची व्यवस्था करण्याचे कामही संबंधित एजन्सीकडे असेल. नव्या एजन्सीची निवड DGIPR च्या पॅनेलवर असलेल्या एजन्सीजमधूनच होईल. याची अंतिम जबाबदारी DGIPR असेल.

मोदी फडणवीसांवर केली होती टीका

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याबदल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र टीका केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेच समाज माध्यमांवर स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी शासकीय कोट्यातून करोडो रुपये खर्च करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button