५५ किलो सोने तस्करीचे पुन्हा सांगलीपर्यंत धागेदोरे

Gold Smuggling

सांगली : देशात सोने तस्करीच्या (Gold Smuggling) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ८३ किलो सोने तस्करी एनआयए (NIA) अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने पकडले होते. त्याच्या तपासाचे धागेदोरे खानापूर आणि आटपाडी तालुक्यापर्यंत पोहोचले आहेत. त्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे आता आणखीन एक नवे प्रकरण समोर आले आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दिल्ली आणि लखनौ येथे गेल्या आठवड्यात छापमारी करून ५५.६१ किलो परदेशी सोने पकडले होते. यातील चोघेजण सांगली जिल्ह्यातील असून दोघेजण खानापूर तालुक्यातील आणि दोघेजण कौठूळी (ता. आटपाडी) तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ माजली आहे.

दिल्ली विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुरुवारी २१ जानेवारीला आठ जणांकडून २८ कोटी रुपये किंमतीचे ५५.६१ किलोग्राम परदेशी सोने जप्त केले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी चार जण हे सांगली जिल्ह्यातील आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्व हवाई मार्ग बंद होते. परंतू सर्व मार्गावर सुरक्षा यंत्रणा सजग होती. याकाळात भारतात, भारत – म्यानमार सीमा तसेच इतर सीमा भागातून परदेशी सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढल्याचे डी. आर. आय. आणि तपास यंत्रणेला लक्षात आले. त्यादृष्टीने सजगता वाढवण्यात आली आहे. दिल्लीत पाच जणांना आणि लखनौ येथे तीन जणांना डीआरआयच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी रोखले. यावेळी दोन्ही ठिकाणी मिळून ५५.६१ किलोग्रॅम वजनाच्या बार्स आणि ३३५ सोन्याच्या पट्ट्या या संशयित आरोपींकडून जप्त केल्या होत्या. विशेष म्हणजे यातील दिल्लीत पकडलेल्या पाच जणांनी त्यांच्या कंबरेला बांधलेल्या बेल्टमधील सोन्याच्या पट्ट्या बांधल्या होत्या. आता या आठही जणांची कसून चौकशी सुरू आहे. हे सोने भारत-म्यानमार सीमेवरून भारतात आणून देशाच्या विविध भागात पाठविण्याचा कट रचला होता. असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER