औरंगाबाद; ५० हजार नवीन अँटिजन किट‌्सची खरेदी

रविवारी दिवसभरात २३१६ चाचण्या, १२२ कोरोना पॉझिटिव्ह

Antigen kits

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या सुरूवातीपासून म्हणजेच १० जूलैपासून मनपाचे आरोग्य पथक शहराच्या विविध भागात अँटिजन रॅपिड आणि आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहे. पहिल्या टप्प्यात अँटिजन चाचणीसाठी १० हजार किट‌्स‌ शहराला मिळाल्या होत्या. मात्र त्या अपुऱ्या पडू लागल्या. शनिवारी अरिहंत नगरमध्ये आरोग्य तपासणी सुरू असताना निम्म्यातच किट संपल्याने नागरिकांना परत जावे लागले होते.

दरम्यान, मनपाने रविवारी दोन कोटी रुपये खर्च करून आणखी ५० हजार किट खरेदी केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. रविवारी दिवसभरात २३१६ जणांची चाचणी करण्यात आली. यात १२२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अर्ध्या तासातच या चाचणीचा अहवाल मिळतो.

चिकलठाणा, झाल्टा फाटा, हर्सूल, दौलताबाद टी पॉइंट, नगरनाका, कांचनवाडी असे शहरात प्रवेशासाठी सहा एंट्री पॉइंट आहेत. या सहा ठिकाणी महापालिकेने पथकांची नियुक्ती केली आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येकाची अँटिजन टेस्ट आणि गरज पडल्यास आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. तसेच शहराच्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्या परिसराच्या ५०० मीटर परिघातील लोकांचीही तपासणी केली जात आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराबाहेरील सहा चेक नाक्यावर ४६८ अँटिजन व २६ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. यात २६ जण पॉझिटिव्ह आढळले. मोबाइल टीमच्या माध्यमातून १२७४ अँटिजन तर १५६ आरटीपीसीआर टेस्ट केल्या. यात ९६ जण पॉझिटिव्ह आढळले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER