औषध परिणाम तपासणीचे ५ हजार बळी!

Drug Testing

पुणे :- परदेशी औषध कंपन्यांनी भारतात २००५ पासून विविध सरकारी, खासगी रुग्णालयांत २००५ पासून केलेल्या औषध परिणाम तपासणी (क्लिनिकल ट्रायल्स) मध्ये सुमारे पाच हजार रुग्णांचा बळी गेला आहे, अशी माहिती स्वास्थ अधिकार मंचाचे सहसमन्वयक अमूल्य निधी यांनी दिली.

याबाबत एका वृत्तपत्रात प्रकाशित बातमीत म्हटले आहे की विविध औषधांच्या या चाचणीत २० हजार ७५८ रुग्णांवर परिणाम झाले. त्यापैकी फक्त ५०८ रुग्णांच नुकसानभरपाई मिळाली.

नवे औषध निर्माण केल्यानंतर त्याचा वापर करण्याआधी त्याचे परिणाम तपासणे आवश्यक असते. देशातील अनेक खासगी डॉक्टर, रुग्णालयांना हाताशी धरून तेथील रुग्णांवर परदेशातील बहुउद्देशीय औषध कंपन्यांसाठी अशा औषध परिणाम तपासणी करत असतात.

२००५ नंतर गेल्या १२ वर्षांत देशात झालेल्या अशा तपासण्या, त्यांचे दुष्परिणाम झालेले रुग्ण आणि त्यामुळे दगावलेल्या रुग्णांच्या यादीची माहिती मिळाली आहे. ‘क्लिनिकल ट्रायल्स’ संदर्भात केंद्र सरकारने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मसुदा तयार केला आहे. त्या मसुद्यावर देशातील आरोग्य संस्थांच्या भूमिका जाणून घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने औषध महानियंत्रकांना (डीसीजीआय) दिले आहेत. यात या चाचण्या विनापरवानगी घेण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत माहिती देतांना अमूल्य निधी म्हणाले की – देशात किती क्लिनिकल ट्रायल्स होतात, याची माहितीच केंद्र सरकारकडे नसल्याने २००७ मध्ये त्यासाठी रजिस्ट्री करण्यात आली. औषध कंपन्यासह संशोधकांना ट्रायल्सची नोंदणी बंधनकारक करण्यात आली. २००५ पासून देशात सुमारे १७ हजार ट्रायल्स झाल्या. त्यामध्ये २० हजार ७५८ रुग्णांच्या शरीरावर गंभीर परिणाम झाले आहेत. कॅन्सर, पॅरलिसिस, विसराळूपणा, चक्कर येणे, श्वासोच्छवास, दमा, अर्धशिशी, त्वचारोगासारखे परिणाम या रुग्णांवर दिसून आले. ४ हजार ९६७ रुग्णांचा या ट्रायल्समध्ये बळी गेला आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ अन्वये ट्रायल्समध्ये मृत्यूमखी पडलेल्या अथवा शरीरावर गंभीर दुष्परिणाम झालेल्या रुग्णांना अथवा किंवा त्यांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद नव्हती. सन २०१३ नंतर या कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर केवळ ५०८ रुग्णांनाच नुकसानभरपाई देण्यात आली. मात्र, चाचणीचा दुष्परिणाम झालेले; तसेच मृत्यूमुखी पडलेल्या उर्वरित रुग्णांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्याबाबत सरकारने काय पावले उचलली, असा प्रश्न स्वास्थ अधिकार मंचाने उपस्थित केला आहे.

औषध परिणाम तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांची आकडेवारी 

वर्ष              दगावलेले रुग्ण               दुष्परिणाम झालेले रुग्ण

२००५                  १२०                                नोंद नाही

२००६                   १३७                               नोंद नाही

२००७                    १३६                              नोंद नाही

२००८                     २८८                             नोंद नाही

२००९                     ६३७                             नोंद नाही

२०१०                      ६६८                            नोंद नाही

२०११                      ४३८                            नोंद नाही

२०१२                       ४३६                          १३१९८

२०१३                      ५९०                           १,१२२

२०१४                      ४४३                          १,३२६

२०१५                     ३८१                          २,३५९

२०१६                     ३७८                          १, ९४४

२०१७                      ३०७                           ८०९

एकूण                       ४ ९६७                         २० ७५८

कोट

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार केंद्राच्या ‘क्लिनिकल ट्रायल्स’ कायद्याच्या मसुद्याच्या सुधारणेसाठी कोणत्या सूचना, शिफारशी असाव्यात याबाबत आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्याबाबतच्या काही शिफारशी लवकरच केंद्र सरकारला देणार आहोत, ज्यामध्ये क्लिनिकल ट्रायल्समध्ये रुग्णहित जपले जाईल; तसेच त्यांचा नाहक प्राण जाणार नाही, अशी ग्वाही स्वास्थ अधिकार मंचचे सहसमन्वयक अमूल्य निधी यांनी दिली आहे.