नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात थिएटरमध्ये रिलीज होणार 5 सिनेमे

Upcoming Movies in 2021

कोरोनामुळे (Corona) 2020 बॉलिवुडसाठी (Bollywood) अत्यंत वाईट गेले होते. पहिले तीन महिने अजय देवगना तान्हाजी आणि दीपिकाचा छपाक, रजनीकांतचा दरबार असे काही सिनेमे प्रदर्शित झाले आणि त्यानंतर कोरोनाने सगळ्या जगाला ग्रासले. लॉकडाऊन (Lockdown) असल्याने सर्व शूटिंग तर बंद झालेच. थिएटर बंद असल्याने सिनेमेही प्रदर्शित झाले नाहीत. लॉकडाऊननंतर थिएटर सुरु झाले पण एकही मोठा हिंदी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही. दुसरीकडे हॉलिवुडवाल्यांनी मात्र टेनेट आणि वंडर वुमन 84 थिएटरमध्ये रिलीज करण्याचे धाडस दाखवले होते. हिंदीत फक्त खाली पीली आणि मंगल पे शनि भारी हेच दोन सिनेमे प्रदर्शित करण्यात आले. आजपासून सुरु होणाऱ्या नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातही असेच सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. जानेवारीत प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांवर एक नजर-

आज शुक्रवार. 1 तारीख. नव्या वर्षाची सुरुवात नसीरुद्दीन शाह अभिनीत ‘राम प्रसाद की तेरहवीं’ या सिनेमाने होणार आहे. हा एक व्यंगात्मक सिनेमा आहे. प्रख्यात अभिनेत्री सीमा पाहवा या सिनेमाचे दिग्दर्शन करीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरत आहे. हा सिनेमा 1 जानेवारीला रिलीज करण्याचे कारणही सिनेमाची कथाच आहे. सिनेमात राम प्रसाद (नसीरुद्दीन शाह) याचे तेरावे 1 जानेवारीलाच दाखवण्यात आलेले आहे. त्याच्या तेराव्याला त्याचे सगळे कुटुंबिय आणि मित्र परिवार नातेवाईक जमा होतात. आणि त्यानंतर जे काही घडते त्याची कथा म्हणजे हा सिनेमा आहे. सिनेमात नसीरुद्दीन शाहची मुख्य भूमिका असली तरी तो जास्तीत जास्त काळ फोटोत दिसणार आहे. नसीरुद्दीनसोबत सिनेमात कोंकणा सेन शर्मा, मनोज पाहवा, परमब्रत चटर्जी, विक्रांत मैसी, बिजेंद्र काला, निनाद कामत, विनय पाठक आणि सुप्रिया पाठक असे नामवंत कलाकार आहेत.

कृती सेननने पहिल्यांदाच दिग्दर्शन करीत असलेल्या सीमा पाहवाचे ट्विटद्वारे अभिनंदन करताना म्हटले की, सीमा मॅम. दिग्दर्शकाच्या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा. ट्रेलर मला खूपच आवडला आणि मला विश्वास आहे की, हा सिनेमा चांगला असेलच. हा सिनेमा भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजीमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.

यानंतर 8 जानेवारीला रामगोपाल वर्माचा हॉरर सिनेमा ‘थ्रिलर- 12 ओ क्लॉक’ रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर 31 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आला होता. या सिनेमात गौरी नावाच्या अशा एका लहान मुलीची कथा सांगण्यात आली आहे जी सतत वाईट स्वप्ने पाहात असते. आणि तिला झोपेत चालायचीही सवय असते. तिच्या या सवयीमुळे ज्या काही घटना घडतात त्या म्हणजे हा सिनेमा. बऱ्याच काळानंतर रामूचा हॉरर जॉनरला सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, मकरंद देशपांडे, दिव्या जगदाळे, मानव कौल, अली असगर, आशीष विद्यार्थी, दलीप ताहिल हे कलाकार आहेत. रामूने या सिनेमाबाबत बोलताना सांगितले होेते, जो जॉनर मला खूप आवडतो त्या हॉरर जॉनरमध्ये मी पुन्हा परतत आहे. मला आशा आहे की, 8 जानेवारीला मी तुम्हाला घाबरवण्यात यशस्वी होईन.

तिकडे साऊथमध्येही सुपरस्टार विजय त्याचा ‘मास्टर’ हा सिनेमा 13 जानेवारीला प्रदर्शित करणार आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांनी पाहावा असे आवाहन धनुषने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून केले आहे. विजयला थलपती विजय नावाने दक्षिणेत ओळखले जाते. या सिनेमाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज ने केले असून यात विजयसोबत विजय सेतुपती आणि मालविका मोहनन यांच्या मुख्य भूमिका आहेत. धनुषने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिले आहे, ‘विजय सरांचा सिनेमा ‘मास्टर’ 13 जानेवारीला रिलीज होत आहे. सिनेप्रेमींसाठी ही एक अत्यंत चांगली बातमी आहे. मला खात्री आहे की प्रेक्षक परिवार आणि त्यांच्या मित्रांसह थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला येतील. यामुळे सिनेमाची संस्कृती पुन्हा एकदा परतेल. थिएटरमध्येच सिनेमा पाहाण्याच्या अनुभवासारखा दुसरा अनुभव नाही. कृपया सगळ्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहावा असे आवाहनही धनुषने केले आहे.

15 जानेवारीला विकी कौशल अभिनीत ‘सरदार उधम सिंह’ सिनेमाही थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लंडनमध्ये जाऊन जनरल ओडायरला उधम सिंह यांनी गोळ्या घालून मारले होते. त्याच कथानकावर हा सिनेमा आधारित आहे. याचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले आहे.

15 जानेवारीलाच राणा दगुबातीचा ‘हाथी मेरे साथी’ हा सिनेमाही रिलीज होणार आहे. प्रभू सॉलोमन द्वारा दिग्दर्शित हा सिनेमा हिंदीसह तामिळ आणि तेलुगुमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. तामिळमध्ये या सिनेमाचे नाव कादन असे ठेवण्यात आले आहे.

एकूणच नव्या वर्षाची सुरुवात तरी चांगली होत आहे. बॉलिवुडसाठी हे वर्ष बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यशाचे ठरेल हेच जानेवारी महिन्याकडे पाहिले तर दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER