अबब! तब्बल 486 धावांची भागिदारी!! आॕस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नवा विक्रम

Will Pucovaski-Marcus Harris

486 धावा फळ्यावर लागल्या तरी एकही गडी बाद झालेला नव्हता. विल पुकोव्हस्की (Will Pucovaski) व मार्कस् हॕरिस (Marcus Harris) यांनी साऊथ आॕस्ट्रेलियाच्या (South Australia) गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. व्हिक्टोरियाची (Victoria) सलामीची ही जोडी पाचशेसुध्दा फळ्यावर लावेल अशीच चिन्हे होती पण अॕश्टन एगरने (Ashton Agar) अखेर यश मिळवले. त्याने मार्कस हॕरिसला यष्टीरक्षक निल्सनकडे झेल देण्यास भाग पाडले. खरं तर हॕरिस नाबादच होता कारण एगरचा तो चेंडू खरं तर फ्रंट फूट नोबाॕल होता पण पंचांच्या ते लक्षात आले नाही आणि ही जोडी तब्बल 486 धावांची सलामी दिल्यावर फूटली. अॕडीलेड (Adelaide) येथील ग्लेनेल्ग ओव्हल मैदानावर हा विक्रम केला.

हॕरिस 27 चौकार व एक षटकारासह केलेल्या 239 धावांवर बाद झाला तर व्हिक्टोरियाने 3 बाद 564 धावसंख्येवर डाव घोषित केला तेंव्हा विल पुकोव्हस्की 255 धावांवर नाबाद (27 चौकार व एक षटकार) नाबाद परतला. योगायोगाने दोघांच्याही चौकार व षटकारांची संख्या सारखीच आहे आणि या भागिदारीदरम्यान एकवेळ धावसंख्या 465 असताना पुकोव्हस्की व हॕरिस हे दोघेही 226 धावांवर खेळत होते.

शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. त्यांनी 30 वर्षांपूर्वीचा वाॕ बंधूंचा विक्रम मोडला. मार्क वाॕ व स्टिव्ह वाॕ या बंधूंनी 1990 मध्ये पाचव्या गड्यासाठी नाबाद 464 धावांची भागीदारी केली होती. न्यू साऊथ वेल्ससाठी वेस्टर्न आॕस्ट्रेलियाविरुध्द त्यांनी हा पराक्रम केला होता.

शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत याआधीची सर्वात मोठी सलामी भागीदारी वेस्टर्न आॕस्ट्रेलियाच्या माईक वेलेट्टा व जेफ मार्श यांनी केलेली होती. 1989 मध्ये साउथ आॕस्ट्रेलियाविरुध्द त्यांनी 431 धावा जोडल्या होत्या. याप्रकारे आता शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सलामीच्या पहिल्या दोन्ही सर्वोच्च भागिदाऱ्या साऊथ आॕस्ट्रेलियाविरुध्दच झाल्या आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च सलामी भागिदारी 561 धावांची होती जी कराची व्हाईटस् संघासाठी वाहिद मिर्झा व मन्सूर अख्तर यांनी 1976-77 मध्ये क्वेट्टाविरुध्द केली होती. आॕस्ट्रेलियन प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये याच्याआधीची सर्वोच्च सलामी 503 धावांची होती. ही क्रिकेट आॕस्ट्रेलिया इलेव्हनसाठी आरजीएल कार्टर व आरोन फिंच यांनी 2015-16 मध्ये सिडनी येथे न्यूझीलँडर्सविरुध्द केली होती.

या भागिदारीसाठी द्विशतकी खेळींसह हॕरिस व पुकोव्हस्की यांनी आॕस्ट्रेलियन कसोटी संघातील स्थानासाठी दावा केला आहे. 22 वर्षीय पुकोव्हस्की हा गेल्या वर्षी चेंडूचा मार लागल्याने काॕन्क्युजनच्या अनुभवातून गेला आहे.

हॕरिस हा 2019 च्या अॕशेस मालिकेपासून संघाबाहेर आहे, या भागिदारीच्या आधीपासूनच तो फाॕर्मात आहे. शेफिल्ड शिल्डच्या गेल्या मोसमात त्याने 49.11 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. 2018- 19 मध्ये त्याने भारताविरुध्द पदार्पणातील मालिकेत 256 धावा केल्या होत्या. त्याचे हे दुसरे द्विशतक होते तर पुकोव्हस्की काल 199 धावांवर नाबाद परतला होता.

शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत चारशेपेक्षा अधिक धावांची ही केवळ पाचवीच भागिदारी आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER