
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बांधण्यात येणाºया विस्तारित इमारतीत आधीपेक्षा सुमारे २५० जादा वकिलांना चेंबरसाठी जागा देण्याचे न्यायालयाच्या प्रशासनाने ठरविले आहे. न्यायालयाचे सहाय्यक निबंधक श्रीकांत पै यांनी ‘सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’ आणि ‘अॅडव्होकेटस ऑन रेकॉर्ड असोसिएशन’ या वकील संघटनांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बांधायच्या विस्तारित इमारतीची एक ‘विंग’ वकिलांच्या चेंबरसाठी देण्याचे आधीच ठरले होते. त्यात किती वकिलांना सामावून घ्यावे व वाटप कसे करावे यावर विचार करण्यासाठी न्या. रोहिंग्टन नरिमन, न्या. उदय लळित व न्या. एल. नागेश्वर राव यांची समिती नेमली गेली होती. या समितीने आधी या नव्या विंगमध्ये २३४ वकिलांना चेंबर देण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र समितीने व सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी आता फेरविचार करून २३४ ऐवजी ४७६ वकिलांना चेंबर देण्याचे ठरविले आहे. याखेरीज अशिलांशी सल्लामसलत करण्यासाठी ३० स्वतंत्र दालने व कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढण्यासाठीही स्वतंत्र जागा देण्याचे ठरविण्यात आले आहे.
नव्या विस्तारित इमारतीचे नकाशे हे बदल लक्षात घेऊन तयार करण्यात यावेत, असे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागास कळविण्यात आले आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी याबद्दल सरन्यायाधीश व अन्य न्यायाधीशांचे आभार मानले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला