४४ हजार शेतकऱ्यांना मिळणार शेतातील मातीची आरोग्यपत्रिका

farmers will get clay Health sheet

कोल्हापूर : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ५०० शेतकऱ्यांना या वर्षी मातीची आरोग्यपत्रिका मिळणार आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील प्रत्येकी पाच गावांतील शेतकऱ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या प्रस्तावावर मंगळवारी स्वाक्षरी केली.

हा प्रस्ताव कृषी आयुक्तांना अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीची प्रयोगशाळेत तपासणी करून, माती आरोग्यपत्रिका देण्यात येते. मातीतील १२ घटकांची नेमकी स्थिती यावरून शेतक-यांना कळते. कोणता घटक कमी झाला आहे, कोणता घटक वाढला आहे, त्यानुसार खतांचे प्रमाण काय असावे, कोणते बियाणे वापरावे, हे निश्चित करता येणे शक्य होते. त्यातून उत्पादनवाढीबरोबर योग्य प्रमाणात खतांचा वापर केल्यास जिल्ह्यात सुमारे दीड कोटी रुपयांची एकत्रित बचत शक्य आहे.

या अभियांतर्गत २०१५-१७ या दोन वर्षांत ६ लाख १६ हजार, तर २०१७-१९ या दोन वर्षांत ५ लाख ७५ हजार आरोग्यपत्रिका तयार करून शेतकऱ्यांना देण्यात आल्या. या वर्षी किमान ४५ हजार शेतकऱ्यांना अशा पत्रिका देण्यात येणार आहेत, त्याच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्यता दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव कृषी आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर मार्चपासून माती नमुने घेऊन तपासणीचे काम सुरू होईल. पुढील पेरणीपर्यंत शेतक-यांच्या हातात ही आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी यादीची प्रतिक्षा