लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४३९ गुन्हे दाखल

२३८ लोकांना अटक; ठाणे ग्रामीण येथे २ नवीन गुन्हे

439 cyber crimes filed during lockdown

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४३९ गुन्हे दाखल झाले असून २३८ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४३९ गुन्ह्यांची (ज्यापैकी २६ N.C आहेत) नोंद २७मे २०२० पर्यंत झाली आहे.

या गुन्ह्यांमध्ये आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८३ गुन्हे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १७३ गुन्हे, tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे, तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत. इन्स्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २३८ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०५ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

ठाणे ग्रामीण

ठाणे जिल्ह्यात २ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सदर पोलीस विभागातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ही १० वर गेली आहे. यातील एक गुन्हा हा मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी महिलेने, पोलिसांचा गणवेष परिधान करून व स्वतः पोलीस असल्याचे भासवून सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनबाबत चुकीची व खोटी माहिती देणारा टिकटॉक विडिओ बनवला व सोशल मीडियावरून प्रसारित केला. त्यामुळे परिसरात लॉकडाऊनच्या नियमावलीबद्दल परिसरातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

तर याच पोलीस जिल्ह्यातील दुसरा गुन्हा हा नवघर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या मोबाईल वरील व्हाट्सॲपद्वारे सरकार व भारतीय रेल्वे नियोजित ज्या गाड्या पर राज्यातील नागरिकांना आपल्या गावी घेऊन जाणार आहेत. त्याबद्दलची चुकीची व खोटी माहिती असणाऱ्या आशयाचा मजकूर विविध व्हाट्सॲप ग्रुपवर पोस्ट केला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये गोंधळ तयार होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER