बुबुळाच्या खरबीमुळे दरवर्षी ४० हजार लोकांना अंधत्व : डॉ. अशोक मदान

medical pc

नागपूर : जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, डोळ्यात जाणारा खाण्याचा चुना, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबूळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. जगात ४.५ कोटी लोकांना अंधत्व येते, त्यात १.७ कोटी भारतीय आहते.

भारतात १२ लाख लोकांना बुबूळाच्या खरबीमुळे अंधत्व आले आहे. दरवर्षी ४० हजार नव्या रुग्णांची यात भर पडत आहे. यात ८० टक्के रुग्ण हे ५० वर्षांच्या आतील आहेत. यावर बुबूळ प्रत्यारोपण हाच एकमेव उपचार आहे. नागपुरातील एकट्या मेडिकल रुग्णालयात दरवर्षी असे ६० च्यावर नवे रुग्ण आढळून येतात, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) नेत्र विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.

ही बातमी पण वाचा : साखरझोपेसाठी करा ‘हे’ उपाय

नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मेडिकलच्यावतीने २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान नेत्रदान पंधरवाडा पाळला जात आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. मदान यांनी वरील माहिती दिली. पत्रपरिषदेत डॉ. कविता धाबर्डे, डॉ. राजेश जोशी, डॉ. मिनल व्यवहारे व डॉ. स्नेहल बोंडे उपस्थित होत्या.

डॉ. मदान म्हणाले, अंधत्व हे केवळ मोतीबिंदुमुळेच येते असे नाही, तर डोळयांना होणाऱ्या विविध आजारांमुळेही अंधत्व येऊ शकते. पारदर्शक पटल अपारदर्शक होणे हा आजार कोणत्याही वयाच्या म्हणजेच लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. अलिकडे मधुमेह, काचबिंदू, वाढते वय आणि बुबूळ खराब होऊन येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाणही वाढले आहे. यावर बुबूळ प्रत्यारोपण हा उपचार असला तरी, आवश्यक त्या प्रमाणात नेत्रदान होणे आवश्यक आहे, असेही डॉ. मदान म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ध्यान केल्यामुळे मोतीबिंदु ग्रस्तांना फायदा

देशात वर्षाला केवळ २८ हजार बुबूळ प्रत्यारोपण

जगात ४५ दशलक्ष लोक अंध आहेत. भारतात याचे प्रमाण १७ दशलक्ष आहे. भारतात बुबूळामुळे आलेल्या अंधत्वाची संख्या १.२ दशलक्ष आहे. यातील बहुसंख्य रुग्णांवर बुबूळाचे प्रत्यारोपण करून अंधत्व दूर करता येऊ शकते. परंतु नेत्रदानाबाबतच्या उदासिनतेमुळे लोकांना आयुष्यभर अंधत्वात जीवन जगावे लागते. धक्कादायक म्हणजे, भारतात हजार लोकसंख्येत ७.३ टक्के लोकांचा मृत्यू होतो. परंतु दरवर्षी केवळ ५२ हजारच नेत्रदान होते. यातही विविध कारणांमुळे केवळ २८ हजार बुबूळ प्रत्यारोपण होते, अशी खंतही डॉ. मदान यांनी बोलून दाखवली.

मेडिकलच्या नेत्ररोग विभागाला ऑगस्ट २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत १४० बुबूळ मिळाले. यात मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांकडून ८१ तर इतर नेत्र पेढीकडून ५९ बुबूळ मिळाले. परंतु सर्वच बुबूळ प्रत्यारोपणासाठी योग्य राहत नसल्याने ६५ रुग्णांवर बुबूळ प्रत्यारोपण करून नवी दृष्टी देण्यात आल्याचे डॉ. मदान यांनी सांगितले. तंबाखू खातांना त्यात मिसळविणाऱ्या चून्यामुळे अंधत्व आलेल्या रुग्णांची संख्या एकट्या मेडिकलमध्ये वर्षाला १२ च्यावर आहे. ‘अ‍ॅसीड’पेक्षाही चूना डोळ्यासाठी धोकादायक ठरतो

समाजकार्यकर्त्यांनी नातेवाईकांना नेत्रदानाचे महत्व सांगणे गरजेचे

डॉ. मदान म्हणाले, मेयो, मेडिकल या शासकीय रुग्णालयांमध्ये दरदिवशी पाच ते सात रुग्णांचा विविध कारणांमुळे मृत्यू होतो. रुग्णाचे मृत्यू प्रमाणपत्र तयार करताना त्या फॉर्मवर नातेवाईकांना नेत्रदानाला संमती आहे किंवा नाही ते भरावे लागते. परंतु बहुसंख्य डॉक्टर त्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच समाजकार्यकर्त्यांकडून नातेवाईकांचे योग्य समुपदेशन केले जात नाही. नेत्रदान कमी होण्यासाठी हे एक महत्त्वाचे कारण आहे. योग्य समुपदेशन झाल्यास नेत्रदानाचा टक्का वाढू शकतो असा विश्वास डॉ. मदन यांनी यावेळी बोलून दाखविला.