चिपळूण मध्ये 35 लाखांचा रक्तचंदन साठा जप्त

रत्नागिरी : चिपळुणातील वन विभाग अधिकारी व कर्मचार्‍यांना या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. यानुसारच पूर्वनियोजित सापळा रचून वन विभागाच्या फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल एस. जी. पाटील यांच्यासह वनाधिकारी व कर्मचार्‍यांनी गोवळकोट रोड येथील आफ्रीन पार्क संकुल परिसरात असलेल्या अल अमिना पार्क निवासी-व्यापारी संकुलाच्या इमारतीतील एका बंद गाळ्यात छापा टाकून 35 लाखांचा रक्तचंदन साठा जप्त केला आहे. रक्तचंदन साठा जप्त करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा बंद गाळा शमिम दाभोळकर यांच्या मालकीचा असून, तो त्यांनी इसा हळदे यांना भाडे कराराने दिल्याचे निष्पन्न झाले आहे तर जप्त केलेला किमती रक्तचंदन साठा नेमका कुणाच्या मालकीचा आहे, या बाबत अद्याप शोध लागला नाही. या संदर्भात इसा हळदे यांचा वन विभाग शोध घेत आहे. सुमारे तीन टन वजनाचे 92 नग जप्त करण्यात आले आहेत.