कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत 342 कोटी जमा, मात्र खर्च 23.82 कोटी

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, त्याला रोखण्यासाठी आरोग्य, पोलीस, विभागातील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे. कोरोनाला हरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार असून, सर्व जनतेने, दानदात्यांनी शक्य ती मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला दानदात्यांनी मोठा प्रतिसादही दिला आहे. आजपावेतो मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 खात्यात देणगीदारांच्या मदतीने 342 कोटी रुपये जमा करण्यात आले असताना प्रत्यक्षात कोविडच्या नावावर केवळ 23.82 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती खळबळजनक माहिती पुढे आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने ही माहिती दिली आहे. विशेष बाब म्हणजे परप्रांतीय कामगारांच्या प्रवासासाठी सर्वाधिक 55.20 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत आणि 80 लाख रुपये औरंगाबाद रेल्वेतील अपघातग्रस्तांना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती खुद्द गलगली यांनी स्वतःच्या ब्लॉगवर दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि वाटप केलेल्या रकमेचा तपशील मागविला होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सहाय्यक लेखापाल मिलिंद काबाडी यांनी अनिल गलगली यांना एकूण जमा रक्कम व वाटपाची माहिती दिली. 18 मे 2020 पर्यंत एकूण 342.01 कोटी रुपये जमा झाले आहेत. या रक्कमेमधून एकूण 79,82,37,070/- रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. खर्च झालेल्या रक्कमेपैकी केवळ 23, 82,50,000 / – रुपये कोविड 19 वर खर्च झाले आहेत. त्यापैकी 20 कोटी रुपये सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबईला देण्यात आले असून 3,82,50,000/ – रुपये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला देण्यात आले आहेत.

प्रवासी मजुरांना देण्यात आलेली रक्कम राज्यातील जिल्हाधिका-यांकडे देण्यात आली आहे जेणेकरून रेल्वेचे भाडे वेळेवर देता येईल. यामध्ये 36 जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांचे रेल्वेचे भाडे, 53,45,47,070/ – इतके आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मजुरांसाठी रेल्वेचे भाडे 1.30 कोटी रुपये तर सांगली जिल्ह्यातील मजुरांसाठी रेल्वे भाडे 44.40 लाख रुपये आहे. औरंगाबाद येथील रेल्वे अपघातातील मजुराला प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे मृत व्यक्तीला 80 लाख रुपयांची आर्थिक मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या खात्यातून देण्यात आली आहे.

अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाने कोविड-19 साठी जमा केलेल्या एकूण रक्कमेपैकी केवळ 7 टक्के रक्कम ही आरोग्य सेवांवर खर्च केलेलीआहे. प्रवासी कामगारांच्या रेल्वे तिकिटावर 16 टक्के आणि रेल्वे अपघातग्रस्तांवर 0.23 टक्के रक्कम खर्च केली आहे.

आजही मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये 262.28 कोटी रुपये शिल्लक आहेत. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, पालिका आणि शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांच्या पूर्ततेसाठी जर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये जमा झालेली रक्कम खर्च केली गेली तर त्यांचा निधी योग्य कामात वापरल्याचा निश्चितपणे देणगीदारांना दिलासा मिळेल.

उल्लेखनीय म्हणजे, कोरोनाव्हायरस (साथीच्या रोगाचा) साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19 ची स्थापना केली आणि लोकांना पैसे देण्याचे आवाहन केले. या देणग्यांना कलम 80 (जी) अंतर्गत प्राप्तिकर माफी मिळेल. बँक खाते क्रमांक 39239591720 आहे. बँक कोड 00300 आहे आणि आयएफएससी कोड एसबीआयएन 0000300 आहे. अनेक एनजीओ, कॉर्पोरेट्स आणि धार्मिक संस्था संकटावर मात करण्यासाठी राज्याच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी पुढे येत आहेत.

Disclaimer : वरील माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने दिली आहे (Click Here)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER