राज्यातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधीशांकडून व्हावी : सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

चंद्रपूर :- मागील भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत करण्याची मागणी खुद्द माजी वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करण्याच्या मागणीवरून वनमंत्री संजय राठोड यांनी सचिव, वने यांना याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याआधारावर मुनगंटीवार यांनी ही मागणी केली आहे. आपण या चौकशीचे स्वागत करत असल्याचे सांगत मुनगंटीवार म्हणाले, जगामध्ये पर्यावरण बदल, ग्लोबल वार्मिंग याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे आणि निश्चितपणे या वसुंधरेला चिंता वाटावी, अशा पद्धतीने पर्यावरणाचा -हास झाला आहे. 1820 ते 2020 पर्यंत साधारणत: जगातील 50 टक्के वृक्ष नष्ट झालेत. याकरीता माजी मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला होता.

हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांच्या सहकार्याने, सेवाभावी संस्थांच्या (एनजीओ) माध्यमातून, धार्मिक ट्रस्टच्या माध्यमातून यशस्वी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात आला. त्यासाठी नागपुरात एक कमांड रुम तयार करून प्रत्येक विभागाला एक लक्ष्य देण्यात आले.

यात एकटा वनविभाग नसून महसूल विभाग, महानगरपालिका, नगर पालिका, विविध संस्था, उद्योगपती, भारत सरकारची ईको बटालियन अशा अनेकांनी यात भाग घेतला. या सर्वांची गोळाबेरीज 33 कोटी असल्याचे ते म्हणाले. मात्र याबाबत उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन होणे गरजचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत करण्याचा निर्णय घेतला तर तो जास्त संयुक्तीक होईल. अन्यथा राजकारणासाठी राजकारण न करण्याची जबाबदारी आपणावर राहील.आपण निश्चितपणे यासंदर्भात उत्तम चौकशी करून सत्यस्थिती राज्यातील जनतेसमोर आणाल असा विश्वास असल्याचे मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.