कोल्हापुरात राजकीय पक्षांना हवेत ३२४ सक्षम उमेदवार

kolhapur-municipal-corporation

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्धार केला आहे. भाजप-ताराराणी आघाडी एकत्र रणांगणात उतरणार आहे. शहरात ८१ प्रभाग आहेत. सर्वच पक्ष सर्वच प्रभागांत उमेदवार मैदानात उतरवतील. परिणामी, या पक्षांना प्रत्येकी ८१ याप्रमाणे तब्बल ३२४ सक्षम उमेदवार शोधावे लागतील. तगडे उमेदवार शोधण्याचे नेत्यांसमोर आव्हान असणार आहे.

गेल्या सभागृहात काँग्रेसचे २८ नगरसेवक होते. २ अपक्षांनी पाठिंबा दिल्याने संख्याबळ ३० झाले होते. सद्यस्थितीत काँग्रेसकडे उमेदवारांचा ओढा असल्याचे दिसत आहे. परंतु, एकेका प्रभागातील इच्छुकांची संख्याही जास्त आहे. त्यातील एकाला उमेदवारी देताना अनेकांना नाराज करावे लागणार आहे. ही नाराजी रोखून ८१ प्रभागांत सक्षम उमेदवार निवडण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची कसोटी लागणार आहे.

तर राष्ट्रवादीपुढे संख्याबळ वाढविण्याचे आव्हान २०१० च्या तुलनेत राष्ट्रवादीला २०१५ मध्ये कमी जागा मिळाल्या होत्या, काँग्रेसने मात्र २०१५ मध्ये चांगले यश मिळवून सर्वाधिक जागा पटकावल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सभागृहात राष्ट्रवादीचे फक्त १४ नगरसेवक होते. सर्व प्रभागांतून लढण्यासाठी राष्ट्रवादीने सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर राष्ट्रवादीचे महापालिकेतील संख्याबळ वाढविण्याचे आव्हान असणार आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार व जिल्हाप्रमुख विजय देवणे हेसुद्धा इच्छुकांशी संपर्क साधत आहेत. गेल्या सभागृहात शिवसेनेचे फक्त चार नगरसेवक होतें. ही संख्या किमान दोन आकडी होण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत.

भाजप-ताराराणी आघाडीही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. २०१५ मध्ये भाजपचे १३ व ताराराणी आघाडीचे १९ नगरसेवक निवडून आले होते. यंदाही दोन्ही पक्ष युती करून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला टक्कर देणार आहेत. भाजपचे प्रदेशाच्यक्ष आ. चंद्रकांत पाटील व माजी खा. धनंजय महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी माजी नगरसेवकांच्या गाठीभेटी घेऊन तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. इतर प्रभागांतून प्रबळ उमेदवार निवडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. अनेक इच्छुकांनीही भाजप- ताराराणी आघाडीशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास यंदा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER