
सांगली : कोरोनाने कहरच केला असून रविवारी सांगली, मिरजेसह जिल्ह्यात तब्बल 32 जणांचा कोरोना अहवाल पॉजीटिव्ह आला तर सांगलीतील गणपती पेठेत दोन दिवसांपूर्वी अहवाल पॉजीटिव्ह आलेल्या 68 वर्षीय वृध्दाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 13 झाली आहे. शेजारच्या शिरोळमधील एक आणि अथणी तालुक्यातील मदभावी येथे दोन रुग्ण सापडले आहेत तर अथणी आणि सोलापूर येथील बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाने जिल्ह्यातील तेरावा बळी घेतला आहेत तर सांगली महापालिका क्षेत्रात रविवारी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. जिल्ह्यातील इतर शहरातही चार तर रविवारच्या अहवालात ग्रामीण भागातील 24 जणांना कोरोनाने गाठले आहे. आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 504 झाली असून यापैकी 277 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 214 जणांवर उपाचार सुरु असून त्यापैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.
आटपाडी तालुक्यातील कानकातरेवाडीतील आठ जणांचा अहवाल पॉजीटिव्ह आला असून यामध्ये सहा पुरुषांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. नेलकरंजीतील 23 वर्षाच्या तरुणाला आणि आाटपाडीतील 49 वर्षाच्या व्यक्तीला कोरोना झाला असून रविवारी एका दिवसात या तालुक्यात दहा बाधित समोर आले आहेत. जत तालुक्यातील बिळूर या हॉटस्पॉटमध्ये रविवारी पुन्हा नवे आठ रुग्ण सापडले. यामध्ये 7,12,15 या तीन बालकांसह पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. कडेगाव येथील 56 वर्षाचा पुरुष, खानापूर तालुक्यातील साळशिंगेत 38 वर्षीय पुरुष, खानापूरात 30, 55 वर्षीय दोन महिला, पलूस तालुक्यातील आमरापूरात 63 वर्षीय वृध्द, तासगाव तालुक्यातील सावळज मधील एका महिलेसह तिघांना, अंजनी येथील 68 वर्षीय वृध्द, इस्लामपूर येथील 20 वर्षीय तरुणी आदींना कोरोनाने गाठले आहे. सांगलीत शंभरफुटी, गणेशनगर, दत्तनगर कर्नाळरोड, मिरजेतील नागरगोजे गल्लीत असे चार रुग्ण सापडले आहेत.
सांगली मिरज हे वैद्यकीय हब असल्याने शेजारच्या कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील आणि नजिकच्या कर्नाटकच्या सीमा भागातून रुग्ण इकडे धाव घेत आहेत. संबधित भागातील 22 बाधितांवर उपचार सुरु असून यामध्ये रविवारी आणखी दोघां बाधितांची भर पडली आहे. अथणी येथील 66 वर्षीय आणि सोलापूर येथील 70 वर्षीय वृध्द रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला