30 हजार कोटींच्या रस्ते कामांची चौकशी : कोल्हापुरातून सुरुवात

Ashok Chavan

मुंबई : राज्यात युतीच्या काळात रस्ते विकासाकरिता पथदर्शी प्रकल्प म्हणून हायब्रीड अ‍ॅन्युटी योजनेंतर्गत 30 हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात हायब्रीड अ‍ॅन्युटी अंतर्गत झालेली रस्त्यांची कामे झाली. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी ना. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली होती. आता या सर्व कामांची राज्यस्तरीय क्वॉलिटी कंट्रोल पथकाकडून चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan)यांनी दिले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आ. प्रकाश आबिटकर यांच्या मागणीवरून सायंकाळी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. यावेळी पायलट प्रोजेक्ट म्हणून जिल्ह्यातील कामांची चौकशी केली जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

या योजनेंतर्गत जिल्ह्यात कोल्हापूर-परिते-गारगोटी-गडहिंग्लज रस्ता (221.97 कोटी), दाजीपूर-राधानगरी-मुधाळ तिट्टा-निपाणी-कलादगी रस्ता (224.01 कोटी), मठकुडाळ-शिवडाव-कडगाव-गारगोटी रस्ता (116.11 कोटी) व विटा-पेठ-मलकापूर-अनुस्कुरा-सातवली-पावस रस्ता (111.60 कोटी) अशी एकूण 673.69 कोटी रुपयांची कामे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून संथगतीने सुरू आहेत तसेच कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आज बैठक झाली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात हायब्रीड अ‍ॅन्युटी अंतर्गत सुरू असणार्‍या रस्ते कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भष्टाचार झाला आहे. सुरुवातीपासूनच ही योजना वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारीही सामील आहेत. याची चौकशी करण्याची गरज आहे.

आ. आबिटकर म्हणाले, राज्यात या योजनेच्या सर्वच कामांची सद्यस्थिती अत्यंत दयनीय आहे. योजनेकरिता लिडार सर्व्हे करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करण्यात आले. प्रत्यक्षात काम करताना या सर्व्हेप्रमाणे न करता ठकेदाराने मनमानी पद्धतीने काम केले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील कामांबाबच्या तक्रारी गंभीर आहेत. याबाबत संपूर्ण राज्यातील रस्ते कामांची चौकशी केली जाईल. पण, त्यापूर्वी पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हायब्रीड अ‍ॅन्युटी अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते कामांची राज्यस्तरीय दक्षता व गुण नियंत्रण महामंडळ, नाशिक यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER